युरो फुटबॉल चॅम्पियनशिप- स्पेनने विजयाची संधी घालवली! पोलंडने 1-1 अशा बरोबरीत रोखले

तीन वेळा युरो चॅम्पियन, एक वेळा फिफा वर्ल्ड कप विजेता आणि एक वेळा ऑलिम्पिकचे विजेतेपद पटकावणारा स्पेनचा फुटबॉल संघ युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील गटातील साखळी फेरीत निराशाजनक कामगिरी करीत आहे. पोलंडने शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत स्पेनला 1-1 अशा बरोबरीत रोखले. गेरार्ड मोरेनो याने पेनल्टीवर गोल करण्याची संधी वाया घालवली. त्यामुळे स्पेनला सलग दुसऱया लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागले. यामुळे आता या गटात स्पेनचा संघ दोन गुणांसह तिसऱया पोलंडचा संघ एक गुणासह चौथ्या स्थानावर आहे. स्विडनने चार गुणांसह पहिले स्थान पटकावले असून स्लोवाकिया तीन गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.

लेवानडोस्कीने साधली बरोबरी

अॅलवेरो मोराटा याने 25व्या मिनिटाला अप्रतिम फिनिशिंग करताना स्पेनला पूर्वार्धात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी पूर्वार्धात कायम राहिली. पण पोलंडचा प्रमुख खेळाडू रॉबर्ट लेवानडोस्की त्यांच्यासाठी धावून आला. उत्तरार्धात त्याने 54व्या मिनिटाला गोल करीत पोलंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पोलंडसाठी ही बरोबरीची लढत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

ग्रुप ऑफ डेथमध्ये चुरस

युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील एफ गट हा ग्रुप ऑफ डेथ म्हणून ओळखला जात आहे. शनिवारी या गटातील साखळी फेरीचा दुसरा टप्पा पार पडला. दोन्ही लढतींच्या निकालानंतर या गटातील चुरस कायम राहिली.  हंगेरीने वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला 1-1 असे रोखले, तर जर्मनीने पोर्तुगालला 4-2 अशा फरकाने हरवत गटात पुनरागमन केले. आता या गटात फ्रान्स चार गुणांसह पहिल्या, जर्मनी तीन गुणांसह दुसऱया, पोर्तुगाल तीन गुणांसह तिसऱया व हंगेरीने एक गुणासह चौथ्या स्थानावर आहे.

पुन्हा एकदा केले मैदानाला टार्गेट

स्पेनच्या संघाला कोरोनाचा फटका या स्पर्धेआधी बसलाय. कर्णधार सर्जियो बसकेट या प्रमुख खेळाडूसह डिएगो लोरेंट याला कोरोनाची लागण झाली. यानंतर स्पेनला युरो चॅम्पियनशिपमधील लढतींमध्ये अडथळा येऊ नये म्हणून प्रशिक्षक लुईस एनरीक यांनी स्पेनच्या अंडर 21 संघांतील काही खेळाडूंना सीनियर संघासाठी बोलावले. कोरोनामुळे धक्का बसल्यानंतर स्पेनच्या फुटबॉल संघाला मैदानात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. आता या अपयशाचे खापर स्पेनकडून मैदानावर फोडण्यात येत आहे. मायदेशात खेळत असलो तरी आमच्या खेळाला साजेसे मैदान नसल्याची तक्रार त्यांच्याकडून या वेळी वारंवार करण्यात येत आहे.

 स्पेनपोलंड लढतीची आकडेवारी

           स्पेन             पोलंड

  • गोल       1             1
  • शॉट      11               5
  • शॉट ऑन टार्गेट 5      2
  • बॉलवरील ताबा 69    31
  • ऑफसाईड    1       2
  • कॉर्नर्स    7            1
  • यलो कार्ड 2          4
  • रेड कार्ड  0   0
आपली प्रतिक्रिया द्या