कोल्हापुरात चौध्या दिवशीही पावसाचा जोर कमी, जलसंपदाच्या समन्वयामुळे पुरस्थिती नियंत्रणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात आज चौथ्या दिवशीही पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. कर्नाटकातील अलमट्टी प्रशासनाशी जलसंपदा विभागाने ठेवलेल्या समन्वयामुळे पंचगंगेची पाणीपातळी 43 फूट धोकापातळीपासून 41 फूट 7 ते 8 इंचांपर्यंत गेल्या दोन दिवसांपासून स्थिर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आहे.

कोल्हापूर जिह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कमी-अधिक दिसून आला. काही काळ कडकडीत ऊनही पाहावयास मिळाले. धरण पाणलोटक्षेत्रातही पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात दिसून आला. शुक्रवारी सायंकाळी राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा बंद होऊन धरणाचे 5, 6 व 7 हे तीनच स्वयंचलित दरवाजे उघडे राहिले होते. त्यामधून पाच हजार 884 क्युसेक विसर्ग सुरू होता. तर, आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास 5 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला. रात्री उशिरापर्यंत राधानगरी धरणाचे सहा व सात क्रमांकांचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले होते. त्यामधून एकूण चार हजार 456 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

अलमट्टीतून सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग

दरम्यान, काल कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे कृष्णा नदीला आलेला पूर आणि कोल्हापुरातील पंचगंगेचे पाणी पुढे जाण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून कालपासून दोन ते सव्वादोन लाखांचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगेची पातळी 41.7 फुटांवर स्थिरावली होती. तर, आज सकाळी काही तास या पातळीत अवघ्या एक इंचाची वाढ दिसून आली. सायंकाळी सहानंतर पुन्हा पंचगंगेची पातळी एक इंचाने कमी झाली होती.