
सामना ऑनलाईन । नांदेड
नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास नाखुष असलेले माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता चव्हाण यांनी मोजक्या नेत्यांसह जाऊन अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण हे पत्नी आमदार अमीता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्ष श्रेष्ठींकडून अशोक चव्हाण यांचेच नाव जाहीर केल्याने अखेर चव्हाणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आमदार अमीता चव्हाण यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघातून चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक यशपाल भींगे रिंगणात आहेत. त्यामुळे नांदेडचा गड राखने चव्हाणांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चव्हाण यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलकिशोर कदम, बापुसाहेब गोरठेकर इत्यादी नेते उपस्थित होते.






























































