राज्यातील सरकार गतिमंद सरकार! माजी मंत्री तनपुरे यांचा आरोप

tanpure

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना कोट्यावधी रुपये राज्य सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खर्च करत आहे. दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा व दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा यांना स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता हे पैसे खर्च करत असतील तर एक प्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा घनाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी करून हे सरकार गतिमान सरकार नसून गतिमंद सरकार आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी मेळावा शिर्डी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज पार पडल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, सुनीता भांगरे, शहराध्यक्ष अभिषेक कळमकर आदि यावेळी उपस्थित होते.

आमदार तनपुरे म्हणाले की, शासन आपल्या दारी असे म्हणत कोट्यावधी रुपयांचा खर्च यासाठी केला वास्तविक पाहता लोकांच्या घरामध्ये जाऊन यांनी दाखले देणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही आज अनेक योजना या प्रलंबित आहे. अनेक योजनांचे पैसे या सरकारला देता येत नाही, कांद्याचे अनुदान पाच वर्ष झाले तरी मिळाले नाही, आज अवघे दहा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आमचे आघाडीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ,या सरकारने 50 हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही देऊ असे जाहीर केले व एक दमडीही यांनी दिली नाही. हे स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात, आजही एक रुपयांमध्ये विमा मिळेल असे सांगतात ,अनेक ठिकाणी ई पीक पाहणी केलीच नाही तर पैसे मिळणार कसे त्यामुळे 75% शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहणार असल्याचेही तनपुरे म्हणाले .राज्यामध्ये कायद्यास सुद्धा धाक राहिलेलं नाही अनेक ठिकाणी हल्ले झाल्याचे प्रकार सुद्धा सगळ्यांनी पाहिलेले आहे, राज्य आता दुष्काळाच्या उंबरठावर असताना या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही, या सरकारची घोषणा गतिमान सरकार अशी नसून ती गतिमंद सरकार आहे असा घनाघाती आरोप सुद्धा तनपुरे यांनी यावेळी केला. आम्ही दिवसाला वीज देण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला पण या सरकारने तो प्रकल्प गुन्हाळून टाकला असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात मग शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात त्याचे यांनी आतापर्यंत कोणते पैसे दिले, अनेक योजना आज ठप्प पडलेल्या आहे, योजना न दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे.

आमच्या सरकार असताना आम्ही जी थकबाकी महावितराची वसूल केली जाईल त्यातील 33% रक्कम ही शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला, आज त्याचे दोन हजार कोटी रुपये पडून आहेत ,हे सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही मग दोन हजार कोटी रुपये कुठे गेले हे सरकारने जाहीर करावे असे आव्हाने त्यांनी यावेळी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरघर जल ची घोषणा केली वास्तविक पाहता आज वाडीवस्तीवर पाणी नाही, योजना करताना कोणताही विचार झालेला नाही, असे अनेक वाड्यावर या त्यापासून वंचित राहणार आहे, एकीकडे अधिकारी वेगळे सांगतात व दुसरीकडे अंमलबजावणी वेगळ्याच पद्धतीने सुरू आहे त्यामुळे ही एक प्रकारे फक्त घोषणाच राहणार आहे असा टोलाही तनपुरे यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही जेवढा निळवण्यासाठी निधी निळवंडे धरणासाठी दिला या सरकारने तेवढा सुद्धा निधी त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत दिलेला नाही करून सारखी परिस्थिती असताना देखील सुद्धा आम्ही त्याचे काम थांबू दिले नाही ,आता या कामाचे श्रेय घेण्यासाठी काहीजण धडपड करत आहे त्यांना प्रश्न सोडवायचे नाही तर त्यांना फक्त उद्घाटन करायचे आहेत असा टोला त्यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला आहे.

आगामी काळामध्ये पक्षाची बांधणी झाल्यानंतर आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी निश्चितपणे रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करू असा इशारा सुद्धा आमदार तनपुरे यांनी दिला आहे. लवकरच नगर जिल्हा दौरा पक्षाच्या दृष्टिकोनातून आम्ही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली बैठक झाली .कार्यकारणी त्या 90 पैकी 60 सदस्य यावेळी उपस्थित होते जे सदस्य अनुपस्थित होते त्यांच्या जागी आम्ही नव्याने नियुक्ती करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले, तसेच लवकर नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे तर दुसरीकडे राज्यातील कार्यकर्त्यांसाठी एक शिबिर शिर्डी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित करणार असल्याचेही फाळके यांनी सांगितले.