माजी आमदार पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश माझ्या आदेशानेच! खडसेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत असतानाच खडसे यांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो माझ्या आदेशावरुनच. पडवी यांनी मला विचारलं होतं की कोणत्या पक्षात प्रवेश करू तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असा गौप्यस्फोट करीत पक्षांतराच्या उंबरठय़ावर असलेल्या खडसे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

जळगावात वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे यांनी खानदेशातील अनेक आमदार माझ्या सोबत आहेत, ही प्रतिक्रिया दिली.  मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रतिप्रश्न विचारला असता खडसे म्हणाले, मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर त्यांच्या प्रवेशावर मी काय बोलू?   मी अजूनही भाजपात आह़े  राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पडवी म्हणाले की ‘एकनाथ खडसे यांनी दिलेल्या सल्ल्याने आणि आदेशानेच मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.’ या पडवी यांच्या वक्तव्याला खडसे यांनीही दुजोरा दिल्याने भाजपमधील आणखी किती  नेत्यांना खडसे यांनी असा सल्ला दिलाय अशा चर्चांना उधाण आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या