
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे (87) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. उद्या, शनिवारी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी पागोरी पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बबनराव ढाकणे यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव हिंद वसतिगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
बबनराव ढाकणे यांनी अकोले सेवा सोसायटीचे चेअरमन पद, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा विधानसभा सदस्य, एक वेळेस विधान परिषद सदस्य, एक वेळेस बीडचे लोकसभा खासदार अशी पदे त्यांनी भूषवली. या काळात त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभेतील जनता दलाचे गटनेते, जनता दलाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ही पदे भूषवली होती. त्यांनी स्थापन केलेला संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखाना हा देशातील ऊसतोड मजुरांचा पहिला साखर कारखाना म्हणून ओळखला जातो.
14व्या वर्षी घेतली होती पंडित नेहरूंची भेट
शालेय शिक्षण घेत असताना बबनराव ढाकणे वसतिगृहात राहत होते. तेथे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी दिल्ली गाठत पंतप्रधान पंडित नेहरू यांची भेट घेत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता.
























































