EXCLUSIVE : गरिबांचा देव श्रीमंत होतोय, विठुरायाच्या खजिन्यात 31 कोटीचे दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

कधीकाळी गरिबांचा देव म्हणून ख्याती असलेल्या श्री विठ्ठलाच्या खजिन्यात आता कोटींच्या घरात दान जमा होत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी 90 लाखांवर पोहचले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटीची अधिकची भर पडली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पदलवाद यांनी ही माहिती ‘दैनिक सामना’ला दिली.

2017-18 या आर्थिक वर्षात समितीस 26 कोटी 56 लाख रूपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यावर्षी मात्र 31 कोटी90 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. जवळपास 5 कोटी रुपये यंदा जास्त मिळाले आहेत. यापैकी समितीच्या कारभारावर 14 कोटी रूपये खर्ची पडले आहेत. समितीचे उत्पन्न वाढत असल्याने या पैशातून भाविकांना अधिक सेवा सुविधा देणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व व्यवस्थापक बालाजी पुदलवाद यांनी सांगितले. तसेच
विविध बँकांमध्ये समितीच्या 80 कोटी रूपयाच्या ठेवी असून याव्दारे समितीस 6 कोटी रूपयांहून अधिक व्याज प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले.

यावर्षी समितीला मिळालेले उत्पन्न –

हुंडीपेटी – 5 कोटी 53 लाख
श्री विठ्ठल चरणावर – 3 कोटी 65 लाख
रूक्मिणी चरणावर- 1 कोटी 7 लाख
बुंदी लाडू – 3 कोटी 55 लाख
विविध देणग्या – 4 कोटी 83 लाख
परिवार देवता – 1 कोटी 28 लाख
नित्यपूजा – 1 कोटी 3 लाख
व्हिडीओकॉन – 40 लाख
चंदन उटी – 26 लाख
परदेशी चलन – 17 हजार

खर्च –

कर्मचारी पगार – 3 कोटी 66लाख
लाडू – 3 कोटी 27 लाख
यात्रा – 1 कोटी 45 लाख
वीजबील – 67 लाख
केरळ पूरग्रस्त व शहीद मदत – 45 लाख
विविध दुरूस्ती – 36 लाख 45 हजार
गोशाळा- 34 लाख
अन्नछत्र – 28 लाख
मंदिरातील उत्सव – 23 लाख
वॉटर एटीएम – 21 लाख