
सामना ऑनलाईन । मुंबई
‘समाजवादाचा गांधींना अपेक्षित असलेला अर्थ सर्व प्रकारच्या शोषणापासून समाजातील सगळ्या घटकांची मुक्ती हा होता. या समाजवादाच्या दिशेने प्रगल्भ समाज म्हणून आपण वाटचाल करायला हवी. यासाठी गांधीचे चरित्र अभ्यासणे नाही तर चारित्र्य समजून घेणे महत्त्वाचे आहे’, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी महात्मा गांधींच्या जीवनाचे पैलू उलगडले.
‘न उलगडलेल्या गांधींना समजून घेताना’ या विषयावर किशनचंद चेलाराम महाविद्यालयात (केसी महाविद्यालय) आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची शनिवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत दिमाखात सांगता झाली. महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गांधींच्या आयुष्यातील न उलगडलेले पैलू आणि त्यांची विचारसरणी या विषयांवर चर्चा करण्यासाठी केसी महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि ‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद भरविण्यात आली होती. या चर्चासत्राची सांगता ९४ वर्षीय स्वातंत्रसैनिक आणि गांधीवादी विचारवंत डॉ. जी.जी. पारीख यांच्या गांधीवादावरील माहितीपूर्ण भाषणाने झाली.
परिषदेचे उद्घाटन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता बागला म्हणाल्या की सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अश्या परिषदांचे महत्त्व अधोरेखित होते. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्दिष्ट केवळ गांधीजींच्या विचारांची ओळख करून देणे इतकेच नसून एकविसाव्या शतकात समाजासमोर असणाऱ्या अनेक समस्यांची उत्तरे गांधीवादातून शोधणे हेही आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या सहवासात असताना आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी आपल्या भाषणातून केले. उपस्थित युवकांसमोर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि ‘श्रमप्रतिष्ठा’ या विषयाचे सध्याच्या काळात असणारे महत्त्व समजावून सांगितले.
परिषदेचे प्रमुख वक्ते, खुदाई खिदमतगार या संस्थेचे राष्ट्रीय प्रवर्तक, श्री फैजल खान यांनी आपले विचार मांडताना धर्मांधता, जातीयवाद आणि गांधी तत्वज्ञान याविषयी वक्तव्य केले. नैतिक शिक्षण आणि मूल्यशिक्षण यांच्याकडे समाजाच्या होत असलेल्या दुर्लक्षाकडे त्यांनी बोट दाखवले व ते म्हणाले, “जोपर्यंत मूल्यशिक्षण या विषयावर शालेय अभ्यासक्रमात भर दिला जाणार नाही तोपर्यंत मानवतावादी समाज निर्माण होणार नाही.” प्रेम, करुणा आणि मानवता या गांधी तत्वज्ञानातील महत्वाच्या मुल्यांची आज जगाला खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.
कस्तुरबा गांधींविषयी चर्चासत्राचे आयोजन परिषदेच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आले होते. यात ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबांची भूमिका अजरामर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, नाटककार व विचारवंत रामदास भटकळ आणि अॅडव्होकेट निशा शिऊरकर हे सहभागी झाले होते. कस्तुरबा यांचे गांधींच्या प्रवासातील स्थान आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांचा गांधींच्या चळवळीतील सहभाग या मुद्द्यांवर या सत्रात चर्चा झाली.
डॉ. एच के एस स्वामी यांनी गांधींचे विचार समजावून सांगण्यासाठी बनवलेल्या विविध मॉडेल्सचे प्रदर्शन हे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण राहिले. प्लास्टिकच्या विघटनाचा प्रश्न, ग्लोबल वार्मिंग, विदेशी वस्तूंचा वाढलेला वापर या विषयांना गांधीजींच्या तत्वज्ञानातून कशी उत्तरे शोधता येतील याचे उत्तम प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले. चरख्यातून सूत कातून आणि खादीच्या कापडांपासून तिरंगा बनवून, अत्यंत सोप्या-साध्या भाषेत ‘स्वदेशी’चे महत्त्व स्वामी यांनी सभागृहाला पटवून दिले.
याशिवाय गांधींबद्दल असणारी मिथके, गांधींचे स्त्री-पुरुष संबंधांवरील विचार, पर्यावरणीय समस्यांचे गांधीवादातून निराकरण अशा विविध विषयांवर या दोन दिवसात चर्चा झाली. परिषदेचा शेवट करण्यासाठी ‘चित्रपट गीतांतून गांधीजी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शास्त्रीय गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी गायन केले.
































































