सुपा औद्योगिक वसाहतीत स्फोट, ऑइल उत्पादक कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील सुपर इन्फो या कंपनीत मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी कंपनीचा कच्चा माल जळून परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले. स्फोटाच्या आवाजाने सुपा पंचक्रोशी हादरली. यासंदर्भात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुपा औद्योगिक वसाहतीतील खराब टायरपासून ऑइल बनविणाऱया कंपनीत स्फोट होऊन मोठय़ा प्रमाणात आग लागली. यावेळी तेथे कामावर असलेले दहा कामगार प्रसंगावधान राखून पळाल्यामुळे सुदैवाने वाचले. स्फोटानंतर लागलेली आग इतक्या मोठय़ा प्रमाणात होती की धुराचे लोट दहा-वीस किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते. संपूर्ण सुपा परिसरावर काळे ढग जमा झाले होते. दरम्यान, आग लागल्यावर कंपनी व्यवस्थापनाने तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ

सुपा औद्योगिक वसाहतीत वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी लागलेल्या आगीत कामगारांचे मृत्यू झाले आहेत. नियमाप्रमाणे कंपनी व्यवस्थापनाकडून आग प्रतिबंधक योजनांची अंमलबजावणी होत नाही. दुसरीकडे वेगाने विकसित होणाऱया सुपा औद्योगिक वसाहतीत मागणी करूनही अग्निशमन दलाची स्थापना केली जात नाही. या प्रकाराबाबत कामगार व सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.