कोरोनासाठी अधिक बेड उपलब्ध होणार, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

1366

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील कोरोना केंद्रात 40 खाटांची अतिदक्षता उपचार सुविधा (आयसीयू) उभारणीचे काम वेगात सुरू असून महालक्ष्मी रेसकोर्स येथील 300 बेडच्या कोरोना केंद्राची विविध कामेदेखील अंतिम टप्प्यात आहेत. शनिवार, 30 मे 2020 पासून या दोन्ही सुविधा रुग्णांसाठी खुल्या होणार आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी अधिक बेड उपलब्ध होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे आढावा बैठक झाली. यावेळी विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोरोना केंद्र अंतर्गतच्या जम्बो फॅसिलिटी सुविधांबाबत प्रारंभी महापालिका आयुक्त चहल यांनी पालकमंत्री ठाकरे यांना माहिती दिली. त्यासोबत महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व दवाखाने या सर्वांमध्ये करण्यात आलेल्या सेवासुविधा, तरतूद, रुग्णांना खाटा व रुग्णवाहिका जलदगतीने व समन्वयाने उपलब्ध करुन देण्याबाबत सुरु असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेमण्यात आलेले सनदी अधिकारी करीत असलेली कार्यवाही, महानगरपालिकेची मदत दूरध्वनी सेवा, अतिदक्षता सुविधांमध्ये करण्यात येत असलेली वाढ, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी व इतर मनुष्यबळ यांच्या समस्यांचे निराकरणासाठी उचलण्यात आलेली पावले या निरनिराळ्या मुद्यांचा प्रगतिपर आढावाही यावेळी घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी तथा सनदी अधिकारी प्राजक्ता लवंगारे, सहआयुक्त (दक्षता) आशुतोष सलील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहआयुक्त (आरोग्य) रमेश पवार, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, डॉ. लकडावाला, डॉ. नीता वर्टी आदी उपस्थित होते.

1) जी/दक्षिण विभागामध्ये नॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे 500 खाटांचे कोरोना काळजी केंद्र या आधीच सुरु झाले आहे. तर विस्तारित सुविधा म्हणून आणखी 150 अशा एकूण 650 खाटांची क्षमता येथे वापरात आहे. त्यात वाढ करुन 40 खाटांची अतिदक्षता उपचारांची सुविधा (आयसीयू बेड) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ‘एनएससीआय’ क्षमता वाढणार आहे.

२) महालक्ष्मी रेसकोर्स येथे पहिल्या टप्प्यात 300 खाटांची क्षमता असलेले कोरोना काळजी केंद्राचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये 100 खाटा या आयसीयू उपचारांसाठी आहेत. या केंद्राचा विस्तार म्हणून आणखी 500 खाटांची उपलब्धता करण्याचे कामही वेगाने सुरु आहे. त्यासोबत आणखी 126 आयसीयू खाटांची सुविधा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले असून तेही 10 ते 15 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या