
सामना प्रतिनिधी, मुंबई
यंदा दिवाळीच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून एस.टी. महामंडळाने 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान 9320 जादा बस फेऱया सोडण्याचे नियोजन केले आहे. नियोजित फेऱ्या वगळून या विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी सदर जादा फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऐनवेळीचा गर्दीचा त्रास टाळण्यासाठी प्रवासी बंधू-भगिनींनी वेळेत आरक्षण करून आपले आसन निश्चित करावे, असे आवाहन परिवहनमंत्री एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
एस. टी. महामंडळाने यंदा दिवाळीसाठी प्रदेशनिहाय जादा वाहतुकीचे नियोजन केले असून नियमित फेऱयांबरोबरच ज्या मार्गावर प्रवासी गर्दी आहे अशा मार्गांवर यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन जादा बसेसच्या फेऱ्या आरक्षणासाठी प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर ऐनवेळी बसस्थानकावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार व्यवस्थापकांनी त्वरित जादा बसेस प्रवासी मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्थानिक एस. टी. प्रशासनांना दिल्या आहेत.
दिवाळी सणाच्या कालावधीत बसस्थानके सुशोभित करावीत व मंगलमय वातावरण निर्मिती करावी. मोठय़ा प्रमाणात जादा वाहतूक होणार असल्याने फिरती दुरुस्ती व गस्त पथके तैनात करण्यात यावीत. परिसरातील सर्व बसस्थानके, जादा वाहतूक नियंत्रण केंद्राच्या जागी प्रवाशांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी. बसेसच्या स्वच्छतेकडे तसेच फेऱयांच्या नियमिततेकडे लक्ष पुरविण्यात यावे व जादा बसेसवर ‘दिवाळी जादा’ असा उल्लेख करण्यात यावा. जादा वाहतुकीच्या कालावधीत आगार व्यवस्थपकांना जादा वाहतूक करताना मदत व्हावी म्हणून विभागीय कचेरीतील अधिकाऱयांची (पालक अधिकारी) नेमणूक करण्यात यावी, तसेच जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर गर्दीच्या कालावधीत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रवासी मित्र’ बिल्ला लावलेले कर्मचारी नियुक्त करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.
summary- extra buses of st for diwali


























































