
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीला हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. हॉटेलवाल्यांनी पुनर्वापर (रियुजेबल) आणि पुनर्प्रक्रिया (रिसायकल) करता येईल अशा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पार्सल देण्याचा पर्याय निवडला आहे. या कंटेनरसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच हॉटेलचे पार्सल महागणार आहे.
इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची माहिती दिली. ‘आहार’चे अध्यक्ष संतेष शेंट्टी आणि सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी प्लॅस्टिकबंदीला समर्थन देत संघटनेच्या सर्व सभासदांनी रियुजेबल आणि रिसायकल कंटेनरचा पर्याय वापरण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. गेल्या तीन महिन्यांत पार्सलच्या कंटेनरला पर्याय शोधण्याचे अनेक प्रयत्न केले. कार्डबोर्डसारखे पर्याय योग्य नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे रियुजेबल आणि रिसायकल प्लॅस्टिक कंटेनरचा विचार केल्याचे त्यांनी सांगितले. या कंटेनरच्या किमती तीन ते पाच रुपयांपासून पुढे असतील. रियुजेबल आणि रिसायकल प्लॅस्टिक कंटेनरचा भार ग्राहकांच्या खिशाला पडणार आहे. एक कंटेनर पुरेसा नसून चटणी, सांबर, कांदा यांच्यासाठी वेगवेगळे कंटेनर वापरावे लागतील. त्यामुळे प्रत्येक पार्सलवर ग्राहकांना १५ ते २० टक्के जास्त रक्कम द्यावी लागेल. त्यामुळे पार्सल महागणार असल्याचे सूतोवाच ‘आहार’ने केले. बंदी लागू झाल्यापासून हॉटेल व्यावसायिकांचे सुमारे ३० टक्के नुकसान झाल्याची माहितीही संघटनेने दिली.इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ या संघटनेचे मुंबई आणि उपनगरात सात हजारांपेक्षा अधिक सदस्य आहेत.
कंटेनर परत द्या आणि पैसे घ्या…बाय बॅक
हॉटेलवाले रियुजेबल आणि रिसायकल प्लॅस्टिक कंटेनरचे पैसे ग्राहकांच्या खिशातून घेणार आहेत. मात्र हे पैसे ग्राहकांना परत देण्यासाठी बाय बॅक योजना राबवली जाणार आहे. काम झाल्यावर कंटेनर हॉटेलात परत द्यायचा आणि पैसे घ्यायचे आहेत. त्यासाठी कंटेनर उत्पादकांसोबत योजना ठरवली जाणार आहे. मात्र कंटेनरच्या स्वच्छतेचे आणि निर्जंतुकीकरण करण्याचे पैसे वगळून रक्कम परत केली जाईल, अशी माहिती ‘आहार’चे अध्यक्ष संतेष शेट्टी यांनी दिली.
विनाकारण दंडाची आकारणी
हॉटेलवाले रियुजेबल आणि रिसायकल प्लॅस्टिक कंटेनर वापरत असूनही काही ठिकाणी महापालिकेचे अधिकारी धाडी टाकून दंड ठोठावत आहेत. चेंबूरमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत. याबद्दल ‘आहार’ संघटनेने नाराजी व्यक्त केली. ज्या कंटेनरच्या मागे रिसायकल आणि इन्जेक्टिंग मोल्डिंग असे शब्द लिहिलेले असतात असे कंटेनर प्लॅस्टिकबंदीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे अशा कंटेनरसाठी दंड भरू नये, असे आवाहन ‘आहार’ने सभासदांना केले.




























































