उन्हाच्या कडक झळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी

या वर्षी उन्हाची काहिली लवकर जाणवू लागली आहे. कमाल आणि किमान तापमानातील ही वाढ म्हणजे येत्या काही दशकांतील तापमानवाढीचे सुतोवाच आहे. हे बदल का आणि कसे होत आहेत हे जाणून घ्यायला हवं.

रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाच्या पाऱयाने सरासरीपेक्षा जास्त उसळी मारली आहे. येत्या काळात तापमानातील ही वाढ प्रकर्षाने जाणवणार आहे. हा अंदाज लक्षात घेता पुढील काही दशकांत वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि कमाल तापमान यांमध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. मार्च, एप्रिल, मे यामध्ये उत्तर हिंदुस्थानात उन्हाळा कडक जाणवणार आहे.

गुजरात, कोकण, छत्तीसगढ, ओडिशा या ठिकाणी कमाल तापमान हे त्यांच्या सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. साधारण 50 टक्के शक्यता यंदा जास्त आहे. या भागात कमाल तापमान 1 ते 2 डिग्रीने तीन महिने जास्त राहणार आहे. याच्या उलट दक्षिणेकडील जो भाग आहे, तिथे तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आयएमडीने हे अंदाज वर्तविले आहेत. मान्सून मिशनने हे मॉडेल तयार केले आहे.

याला लिना किंवा एल निनो कारणीभूत नाही. आता त्यांची न्यूट्रल स्थिती आहे. सध्या शक्यता राहते ती म्हणजे संपूर्ण पृथ्वीभोवती जे पश्चिमेकडून वारे वाहतात, पूर्व-पश्चिम वारे हे थोडे खाली सरकले आहेत. ते उत्तरेच्या भागात वाहत असतात. तीन किलोमीटर ते बारा किलोमीटर उंचीवरून ते वाहतात. जम्मू, कश्मीर परिसरात हे वारे खूप खाली सरकलेले दिसतात. ते खालीवर असे वाहत राहतात. त्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती होत नाही. त्याचा परिणाम म्हणजे जमिनीचे तापमान वाढते. हवा जर स्थिर असेल तर वातावरणातले तापमान वाढते. असं जे तापमान वाढतं तो म्हणजे पश्चिमी वाऱयाचा प्रताप असतो. त्यामुळे एल निनो आणि ला नीना यांच्याशी त्याचा संबंध नसतो.एल निनो आणि ला नीना यांची स्थिती वर्ष दोन वर्षे तशीच राहते. त्याचा मान्सूनवर परिणाम होतो. त्यामुळे मान्सून क्षीण होतो. ही पावसाळ्यातली स्थिती झाली. मार्च ते मे महिन्यात विचार करताना उत्तर हिंदुस्थानातल्या तापमानात वाढ होणार आहे. महाराष्ट्रामधला कोकण भाग या ठिकाणी उष्णता जास्त जाणवणार आहे.

सूर्याच्या उष्णतेमुळे कमी दाबाचे क्षेत्र संपूर्ण जमिनीवर तयार झालेलं असतं. कमाल तापमान आणि आर्द्रता यांच्यातील स्थितीला भासमान तापमान म्हणतात. हवेत बाष्प जास्त असेल तर शरीराला खूप घाम येतो. हवेत आर्द्रता खूप असते तेव्हा शरीराचे तापमान वाढते. या काळात म्हणजे मार्चमध्ये पडलेल्या पावसाचे दोन परिणाम होतात. एक म्हणजे हा पाऊस जमिनीत मुरत नाही. जमीन तापते. पाण्याचे बाष्पीभवन होतं. त्यामुळे उष्णता जास्त वाढते. उत्तरेकडे जमिनीचा भाग मोठा आहे. तिथे जमीन तापते. तिकडे समुद्राकडून वाहणारे थंड वारे नसतात. त्यामुळे तिकडे उष्णतेची लाट येते. आपल्याकडे मध्य प्रदेश, ओडिशा, विदर्भ इकडे उष्णता जास्त असते. सूर्याची उष्णता वाढत आहे. सूर्याची वाटचाल ही उत्तरेकडे सुरू आहे. ती किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे जास्त उष्णता निर्माण होते. यंदा उन्हाळा तीव्र आहे. भारतीय हवामान संघटनेने आंतरराष्ट्रीय एजन्सीने तसं सांगितलं आहे. उत्तर हिंदुस्थान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी उष्णता जास्त राहणार आहे. पश्चिमी वारे, ढगांची निर्मिती नसल्यामुळं आकाश निरभ्र राहणार आहे. या काळात योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे.

रशिया, चीन या देशांत रॉकेटचा वापर करून गारा वितळवतात. मुंबई येथील रडारवरून आपल्याला ढगांची उंची समजू शकते. त्यावरून पाऊस किती पडेल याचा अंदाज काढता येतो. जे होणार असतं त्याला इलाज नाही, पण जे शक्य आहे तिथे काळजी घेऊन आपण धोका कमी करू शकतो. मार्चमध्ये 10 ते 12 मिलीमीटर पाऊस पडतोच. त्यामुळे त्याला आपण अवकाळी म्हणू शकत नाही. पावसाळ्याइतका तो पडत नाही इतपंच. आपली पीक पद्धती बदलली आहे. रशियासारख्या देशात ज्या ढगात गारा तयार झाल्या आहेत, त्या रडारच्या माध्यमातून समजतात. तिथे रॉकेटचा मारा करून त्या पसरवल्या जातात. त्यासाठी मोबाईल सिस्टीम चांगली पाहिजे. रडारसाठी रेंज चांगली हवी. ती असते 300 किलोमीटर. त्या ठिकाणाहून कितपत रेंज मिळणार? इतर ठिकाणच्या ढगांचा अंदाज येण्यासाठी हा पण विचार केला पाहिजे. मराठवाडय़ाचा भाग मुंबईच्या रडारमध्ये येतच नाही. मध्य महाराष्ट्राचा भाग येत नाही. म्हणून रेंज चांगली हवी. रशिया, चीन इथे गारांमुळे खूप नुकसान होते. त्यामुळे ते रडारचा वापर करतात. ते गारा लगेच वितळवून टाकतात.

काय काळजी घ्यायला हवी?

भासमान तापमान वाढलेले असेल आणि हवेत आर्द्रता जास्त असेल तेव्हा 42 ते 43 डिग्री तापमान होतं. त्याचा शरीरावर परिणाम होतो. शरीराच्या कुलिंग सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. विविध अवयवांवर त्याचे परिणाम होतात. सुरुवातीला मेंदूवर होतो. त्यामुळे चक्कर येऊन पडणं असे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असे वाढलेले तापमान असतं तेव्हा दुपारी उन्हात जाऊ नये. शक्यतो दुपारी बारापूर्वी आपली कामे करावीत. नाहीतर सायंकाळी चारनंतर करावीत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दुपारी शक्यतो कष्टाची कामे न करणे हिताचे ठरते. या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्यामुळे झाडाच्या खाली थांबू नये. कारण झाडावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. गारा पडतात त्या गोटीएवढय़ा आकारात असतात तेव्हाही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वादळी पावसात पत्रे उडतात, त्यावेळी त्यावर जड वजन ठेवावे. या काळात मेटल बॉडी असलेल्या वस्तूंना हात लावू नये. त्यातून वीजप्रवाह जाऊन शॉक बसण्याचा धोका असतो. ही काळजी घेतली तर हमी मिळते.

शब्दांकन – मेधा पालकर

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ञ आहेत)