
सामना प्रतिनिधी। मालवण
कासारटाका-चौके मार्गावर रविवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी कणकवली व मालवणच्या गटातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चौके बावखोलवाडी येथे रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान कणकवलीतील युवकांची गाडीची धडक मालवण येथील एका तरूणाच्या गाडीस लागली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची व नंतर मारहाण झाली. यात मालवणच्या गटातील तरूणांकडून कणकवलीच्या तरुणांना मारहाण झाली तसेच गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना समज दिली.
याप्रकरणी मालवण, कणकवली या दोन्ही गटातील तरुणांची कट्टा पोलीस दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानुसार विनोद मनोहर परब (४४) गणेश शशीकांत सावंत (३२) सुनील राजाराम सावंत (४४), सुनील सुरेश परब (३३), प्रसाद मारूती सावंत (४२) जोसेफ फ्रान्सिस नर्होंना (३८) हरीश चंद्रकांत सावंत (४६) अमोल केळूसकर या आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांवर अटकेची कारवाई केली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































