महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली आणणार

600

महापालिका रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या थम्ब बायोमेट्रिक हजेरीऐवजी आता लवकरच कर्मचाऱ्यांचे चेहरे ओळखून हजेरी लावणारी नवी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर लवकरच याची सुरुवात होणार असून कर्मचाऱ्यांच्या थम्ब बायोमेट्रिक हजेरीला आता फेशियल बायोमेट्रिक हा नवा पर्याय येणार आहे. त्यामुळे थम्ब बायोमेट्रिकमुळे कर्मचाऱ्यांना असलेला कोरोना संसर्गाचा धोकाही टळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाचा दौरा महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी शुक्रवारी केला. यावेळी त्यांनी कोरोना वॉर्डमध्ये जाऊन कक्षाची पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली. या पाहणीत काही वॉर्डमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी गैरहजर असल्याचे महापौरांच्या निदर्शनाला आले. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख रुग्णालय व 16 सर्वसाधारण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती व आरोग्य सेवासुविधांचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी आढावा घेतला.

प्रणाली उपयुक्ततेवर एकमत
बैठकीत अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक या सर्वांचे पालिका रुग्णालयांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बायोमेट्रिक प्रणाली असली पाहिजे, यावर एकमत झाले. यावेळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी चेहरा ओळख दर्शवणाऱ्या प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीची उपयुक्तता ओळखून सर्व तांत्रिक मुद्द्यांची तज्ज्ञ मंडळीद्वारे तपासणी करून प्रायोगिक स्तरावर नायर रुग्णालयामध्ये ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश महापौरांनी दिले. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात झालेल्या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू यांच्यासह प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  • रेल्वेच्या जलद स्टेशनवरून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याकरिता बेस्ट बसची व्यवस्था करण्याची मागणी सर्वांनी केली. याबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त यांना दिले.
  • पुढील आठवड्यापर्यंत सर्व रुग्णालयाच्या प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या सोयीच्या स्टेशनबाबतचा उल्लेख असलेली यादी सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
  • चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण लक्षात घेता, सर्वच रुग्णालयांनी जास्तीत जास्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर भरती करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
आपली प्रतिक्रिया द्या