
गेला काही काळ जगभरातच आभासी चलनाचे व्यवहार आणि त्यांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होते आहे आणि या आभासी चलनाची लोकप्रियतादेखील वाढत चालली आहे. अनेक देशांत आजही या चलनांना आणि त्यांच्या व्यवहारांना अधिकृत मान्यता नसली, तरी या चलनात व्यवहार करणारे त्याची तमा न बाळगता हा व्यवसाय वाढवतच आहेत. याचाच फायदा घेण्याच्या उद्देशाने आता फेसबुकसारखी जायंट कंपनीदेखील या क्षेत्रात उतरते आहे.
सध्या जगभरात उपलब्ध असलेली अनेक आभासी चलने अर्थात क्रिप्टोकरन्सी आणि त्यांची विश्वासार्हता बघता, फेसबुकने मात्र अत्यंत नियोजनबद्ध रूपात आपले आभासी चलन दाखल करण्याची योजना आखली आहे. फेसबुकने नुकतीच आपल्या ‘लिब्रा’ या आभासी चलनाची घोषणा केली आणि त्याच वेळी या चलनाच्या व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट वॉलेट ‘कॅलिब्रा’देखील उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘लिब्रा’ या फेसबुकच्या आभासी चलनाचे सर्व व्यवहार हे ‘कॅलिब्रा’ या माध्यमातून होणार आहेत. अधिक सुरक्षा बाळगत फेसबुकने या आभासी चलनाच्या सुरक्षा आणि प्रसिद्धीसाठी ‘लिब्रा फाऊंडेशन’चीदेखील घोषणा केलेली आहे. ‘कॅलिब्रा’च्या माध्यमातून लिब्रा करन्सीचे व्यवहार अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्याचा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे. कॅलिब्राशी जोडल्या गेलेल्या यूजर्सची वैयक्तिक माहिती आणि ओळख पूर्णपणे गुप्त आणि सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. कॅलिब्राच्या जोडीलाच फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातूनदेखील लिब्रा उपलब्ध करून देण्याचा फेसबुक विचार करत आहे. ज्याप्रमाणे मेसेजेसची देवाण-घेवाण केली जाते, अगदी तेवढय़ाच सुलभपणे या लिब्रा करन्सीचे व्यवहार करणे शक्य असणार आहे. बाजारातील क्रिप्टोकरन्सीजमधली वाढती चुरस बघता, फेसबुक लिब्रासाठी इतरही काही सुविधा अथवा सवलती देऊ शकते. यूजर्सची गोपनीयता, व्यवहारासाठी स्वतंत्र ऍप आणि फेसबुक, व्हॉट्सऍप यासारखे जगप्रसिद्ध व्यासपीठ या सर्वाच्या जोरावर ‘लिब्रा’ वर्षभरातच बाजारात दाखल होण्याचा अंदाज आहे.
– स्पायडरमॅन


























































