
>>मंगेश सौंदाळकर
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हा भविष्यातील उदरनिर्वाहाचा आधार मानला जातो. पण या आधाराला सायबर ठगाने टार्गेट केले आहे. पीएफ कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी बोलतोय असे भासवून तुमचे पैसे परत करायचे आहेत. परत केलेले पैसे जर सरकारी योजनेत गुंतवल्यास डबल पैसे मिळतील. त्यासाठी एक प्रोसेस फी भरायला लावून सायबर ठग हे बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. अशा प्रकारे फसवणुकीचा एक गुन्हा पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
सध्या लॉकडाऊन काळात नोकऱया गेल्याने बहुतांश जण हे बेरोजगार झाले आहेत. नोकरीनंतर अशांना पीएफच्या रकमेचा काही दिवस आधार असतो. या आधाराला हेरत सायबर ठगांनी फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सायबर ठग हे नागरिकांना फोन करतात. तुम्ही अमूक कंपनीत कामाला होतात. तुम्ही अमूक वर्षे तेथे सेवा केल्याने तुमच्या मालकाने खात्यात पीएफची रक्कम भरली आहे. सध्या तुम्ही बेरोजगार किंवा सेवानिवृत्त असल्याने ती रक्कम तुम्हाला वेळेत दिल्यास त्याचा फायदा होईल असे भासवतात. आम्ही मुंबई, दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंदिगड पीएफ कार्यालयातून आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त बोलत असून तुमची रक्कम वेळेत देणे आमचे कर्तव्य आहे अशा भूलथापा मारतात. तुमच्या खात्यात अमूक रक्कम जमा झाली आहे. ती रक्कम लवकर मिळावी म्हणून तुम्हाला एक चलन भरावे लागेल, भरलेल्या चलनाच्या रकमेमधील काही अंश रक्कम प्रोसेस फी म्हणून घेऊन उर्वरित रक्कम पुन्हा खात्यात जमा करू असे भासवून पैसे भरायला लावतात. अशीच एक फसवणूक समोर आली आहे. या प्रकरणात तब्बल 33 लाखांची फसवणूक केली आहे.
डबल रकमेच्या मारतात भूलथापा
सायबर ठग हे फोन केल्यावर तुमची पीएफची रक्कम खूप आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वच रक्कम खात्यातून काढू नका. तुमची रक्कम आम्ही सरकारी योजनेत गुंतवू. त्या गुंतवणुकीतून तुम्हाला पैसे दुप्पट मिळतील असे सांगून ठग पैसे काढतात. एकदा का पैसे आले की ठग हे फोन उचलणे बंद करतात.
अशी खबरदारी घ्या
- कर्मचाऱयांच्या पीएफबाबत पीएफ कार्यालयातून कधीच फोन केला जात नाही.
- जर कोणी पीएफ कार्यालयातून बोलतोय असे सांगून फोन करत असेल तर त्याला बँक खात्याची माहिती देऊ नका. तत्काळ जवळील कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करावी.
- गुगल सर्च इंजिनमध्ये असलेले सर्वच नंबर खरे असतात असे नाही. सायबर ठग हे नंबरांमध्ये फेरबदल करून दुसरे नंबर अपलोड करतात. अपलोड केलेल्या नंबरवर फोन केल्यास ठग हे फसवणूक करतात.
- जर ऑनलाइन पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगावी.
- कोणी ठग जर पैसे रिफंडच्या नावाखाली क्यूआर कोड पाठवून तो कोड स्कॅन करायला लावत असेल तर तसे करू नका. तो क्यूआर कोड हा तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी असतो.
































































