
बनावट मिळकतपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणाऱया नगरभूमापन कार्यालयातील दोन कर्मचाऱयांसह पाचजणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ हिरालाल भांडेकर, मल्लीनाथ बसप्पा तोटद (कर्मचारी), मल्लीनाथ हणमंतराव अयलेर, अनिरुद्ध ज्ञानेश्वर निरगुडे, राजू महादेवसा बिद्री (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सोलापूर येथील नगरभूमापन कार्यालयात विश्वनाथ हिरालाल भांडेकर हे शिरस्तेदार म्हणून, तर मल्लीनाथ बसप्पा तोटद हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. या दोघांनी मिळकतदार मल्लीनाथ अयलेर, अनिरुद्ध निरगुडे, राजू बिद्री यांच्याशी संगनमत करून शासकीय दस्तऐवजांत बनावट नोंदी केल्या आहेत.
मिळकतपत्रात खाडाखोड करून मिळकतदारांची नवीन मिळकतपत्रे तयार केली आहेत. यात शासनाचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नगरभूमापन अधिकारी किरण अशोक कांगणे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यांतील शिरस्तेदार विश्वनाथ भांडेकर यांची पुण्यातील कार्यालयात नुकतीच बदली झाली आहे. फौजदार तोटदार तपास करीत आहेत.


























































