पोलीस असल्याची बतावणी करून दोघांना लुटले

police

पोलीस असल्याची बतावणी करून एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 चेन भामट्यांनी पळवून नेण्याचा प्रकार पेण शहरातील काका मनोहर चाळ समोर घडला.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की शहरातील विठोबा चांगू म्‍हात्रे उर्फ कणेकर भाऊजी ( वय 75 ) हे कामानिमित्त सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. पेण शहरातील काका मनोहर चाळ या ठिकाणी आल्यानंतर एका भामट्यानी आपण पोलिस असल्याची बतावणी करून पोलिसांनी कालच गांजा तस्करी करणाऱ्या व्यक्तींना पकडला आहे म्हणून त्यांनी म्हात्रे यांच्या पिशवीची तपासणी केली. यावेळी मागून येणाऱ्या आणखीन एका युवकाच्या पिशवीची सुद्धा या भामट्याने तपासणी केली तसेच सदर युवकाला गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याच्या खिशात ठेवायला सांगितली. यानंतर या भामट्यांनी म्हात्रे यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन काढायला त्या युवकाला सांगितले. सदर चेन काढून म्हात्रे यांच्या हातात दिल्या. यानंतर त्या चेन या भामट्यांनी म्हात्रे यांच्या हातून हिसकावून घेऊन त्यांच्या पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला व चेन घेऊन तेथून दुचाकीवर बसून पोबारा केला. यानंतर विठोबा म्हात्रे यांनी सोन्याच्या चैनीचा शोध आपल्या पिशवीत घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या