मुलांच्या लसीकरण मोहिमेत ‘फॅमिली डॉक्टर’, लसीकरणाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबई – मुंबईत 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस दिल्याने मुंबई ‘कोरोना सुरक्षित’ झाली असली तरी लहान मुलांच्या लसीकरणाला अजून गती मिळालेली नाही. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाला वेग देण्यासाठी आता ‘फॅमिली डॉक्टर’चा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी वॉर्ड स्तरावर आपापल्या विभागातील खासगी दवाखाना चालवणाऱया डॉक्टरांची बैठक घेऊन लसीकरणासाठी जनजागृती, प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. यानंतर पालिका, खासगी केंद्र आणि सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटरवर झालेल्या लसीकरणात मुंबईतील 100 टक्के जणांना दुसरा डोस देण्याची कामगिरी 5 एप्रिल रोजी पूर्ण झाली.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने 15 ते 17 आणि 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर 3 जानेवारीपासून 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तर 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने लसीकरण मोहीमेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर शाळा परिसरात, गणेश मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळे, क्रीडा मंडळे, उन्हाळी शिबिरे आयोजक यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला गती देणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. यासाठी विशेष क@म्पचे आयोजनही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

असा होणार फायदा
लसीकरणाबाबत पालक व मुलांमध्ये असलेला संभ्रम-गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवरील फॅमिली डॉक्टरांचा लसीकरण मोहीमेत समावेश करण्यात येणार आहे. हे डॉक्टर आपापल्या विभागातील, संपका&तील मुले, पालक यांच्याशी संपर्क साधून लसीकरणाला प्रोत्साहन देतील.

अशी आहे मुलांची संख्या
15 ते 18 वयोगट – 9 लाख 22 हजार 516
12 ते 14 वयोगट – 4 लाख
12 ते 17 वयोगट – 13 लाख 22 हजार 516