
प्रख्यात संतूरवादक पंडित भजन सोपोरी यांचे गुरुवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पंडित सोपोरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुग्रामच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
पंडित भजन सोपोरी यांचा जन्म 1948 साली श्रीनगर येथे झाला. त्यांचे आजोबा एस. सी. सोपोरी आणि वडील पंडित एस. एन. सोपोरी हेदेखील संतूरवादक होते. भजन सोपोरी यांना संतूरचे शिक्षण घरातून मिळाले. ते सुफियाना घराण्याशी संबंधित होते.
पंडित सोपोरी यांनी संस्कृत, अरबीसह कित्येक भाषांतील हजारो गाण्यांना संगीत दिले आहे. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 2004 सालचा ‘पद्मश्री’, 1992 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या महिन्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले. त्यानंतर आता भजन सोपोरी यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.



























































