
सामना ऑनलाईन। चेन्नई
तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रियंकाच्या मृत्यूच्या घटनेने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. प्रियंकाच्या बेडरुममध्ये तिने लिहलेली सुसाईड नोट सापडली आहे. यात तिने घरातील कलहाला कंटाळून आपण आयुष्य संपवत असल्याचं तिनं म्हटल आहे.
प्रियंका सध्या तमिळ मालिका ‘वामसम’ यात ज्योतिकाची भूमिका करत होती. यात तिच्याबरोबर बाहुबली फेम रम्या कृष्णनन देखील काम करत होत्या. या मालिकेतील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून दाद दिली होती. यामुळे मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही प्रियंका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. पण दुसरीकडे प्रियंकाचे वैवाहिक आयुष्य वादात सापडले होते. लग्नाला ३ वर्ष उलटून गेले तरी प्रियंकाला मूल होत नसल्याने सासरी तिची कुचंबणा व्हायची. अखेर या सर्वाला कंटाळून तिने बुधवारी आयुष्य संपवले. नेहमीप्रमाणेच कामवाल्याबाईने सकाळी प्रियंकाच्या बेडरुमचा दरवाजा ठोठावला. पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. तेव्हा तिने दरवाजा उघडला असता प्रियंकाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत पंख्याला लटकत असल्याचे तिला आढळले.
























































