महाभयंकर ‘फनी’ ओडिशा किनारपट्टीवर आदळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘फनी’ हे चक्रीवादळ अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते शुक्रवारी दुपारपर्यंत ओडिशामध्ये धडकू शकते, असा इशारा केंद्रीय हवामान खात्याने मंगळवारी दिला होता. ‘फनी’ची भीषणता याआधी आलेल्या ‘तितली’ वादळापेक्षा भयानक असेल असे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे केंद्राने ओडिशासह चार राज्यांना बचाव कार्याच्या पूर्वतयारीसाठी 1,086 कोटींची प्राथमिक मदत तत्काळ देण्याचे आदेश केंद्र सरकारने प्रशासनाला दिले आहेत.

सध्या ‘फनी’ वादळ दक्षिण पूर्वेकडे आणि बंगालच्या उपसागरात असून ते पुरीपासून 830 कि.मी.वर, विशाखापट्टणमपासून (आंध्र प्रदेश) 670 कि.मी.वर आणि त्रिंकोमालीपासून (श्रीलंका) 680 कि.मी. अंतरावर आहे, असे हवामान खात्याने दुपारी जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

‘फनी’ चक्रीवादळ पुढील 12 तासांमध्ये अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते 3 मे रोजी दुपारपर्यंत ओडिशाच्या किनाऱयावर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी 170-180 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन बचाव बल (एनडीआरएफ) आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

केरळ, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशात पुढील 24 तासांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ओडिशात गुरुवारी हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘फनी’ला तोंड देण्यासाठीची सज्जता

  • केंद्राने एनडीआरएफच्या 41 टीम चार राज्यांत पाठवल्या आहेत. आंध्र प्रदेशात 8, ओडिशात 28 आणि पश्चिम बंगालमध्ये 5 अशा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या तुकडय़ा रवाना झाल्या आहेत.
  • नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि नौका बचावकार्यासाठी किनारपट्टीवर तैनात.
  • गरज पडल्यास लष्कर आणि हवाई दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
  • निवडणूक आयोगाने मदतकार्यासाठी ओडिशाच्या 11 जिह्यांत आचारसंहिता शिथिल केली.
  • पुरी आणि ओडिशातील पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले.