न्यूझीलंडमधील हल्ल्यात आणखी एका हिंदुस्थानीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ख्राईस्टचर्च

न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील मशिदीवर माथेफिरून केलेल्या गोळीबारात आणखी एका हिंदुस्थानीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फरहाज अहसान असे त्या मृत्युमुखी पडलेल्या हिंदुस्थानी नागरिकाचे नाव असून त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. फरहानला एक सात वर्षाची मुलगी व चार महिन्याचा मुलगा आहे.

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे शुक्रवारी दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला होता. या अंदाधुंद गोळीबारानंतर नऊ हिंदुस्थानी वंशाचे नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. फरहाज अहसान हा 2010 मध्ये न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला होता तर त्याचे आई वडिल हैदराबाद येथे राहतात.

याआधी या हल्ल्यात गुजरातमधील जुनैद कारा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. जुनैद गेल्या अनेक वर्षांपासून  कुटुंबीयांसह न्यूझीलंडमध्ये राहत होता. तो तेथे एक दुकान चालवत होता. शुक्रवारी मशिदीत नमाज पढण्यासाठी तो गेला असता हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.