मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला दोषी ठरवून आडत व्यापाऱ्याची आत्महत्या

114

सामना प्रतिनिधी । धाराशिव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराला दोषी ठरवून जिल्ह्यातील कळंब येथील एका आडत व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकारी धोरणाने व्यापारी संपवला असल्याची खंतही या व्यापाऱ्याने मागे ठेवलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून व्यापाऱ्याने आत्महत्या करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

निपणी येथील दत्तात्रय दादाराव गुंड हे कळंब येथे आडत व्यापारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी सहा हजार रुपये भावाने ८०० क्विंटल हरभरा खरेदी केला होता. तो अजून तसाच पडून आहे. सरकारच्या बेपर्वाईने दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सधन असूनही डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या ताणामुळे दत्तात्रय गुंड हे प्रचंड अस्वस्थ होते. शेतकरी संपामुळे त्यांची बेचैनी अजून वाढली. या विमनस्क परिस्थितीतच त्यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली. या छोट्याशा चिठ्ठीत गुंड यांनी सरकारच्या बेजबाबदार कारभाराचा तसेच शेतीविषयक धोरणाचा पंचनामाच केला आहे.

सगळे व्यापारी व शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. व्यापाऱ्यांनी तारल्यामुळेच आतापर्यंत शेतकरी जिवंत होता. नुकतीच कुठे आमची बरी सुरुवात झाली होती. मात्र तुमच्या सरकारी धोरणाने व दुष्काळाने ते संपविले आहे. आपल्या धोरणामुळे शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करून शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा अशा शब्दांत दत्तात्रय गुंड यांनी सरकारच्या धोरणाचे वाभाडे काढले आहेत. हमीभाव, कर्जमाफी, पुâकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे शेतकरी डबघाईला आल्याचा आरोपही गुंड यांनी केला आहे.

याच चिठ्ठीत दत्तात्रय गुंड यांनी कुटुंबियांची माफी मागितली असून आपण शासनाचे धोरण, खासगी कर्ज आणि व्याजाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. कुटुंबियांनी त्रास करू नये, लहान मुलांना दूर करू नका असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे. दत्तात्रय गुंड यांच्या आई सरपंच आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या