नापिकी आणि कर्जबारीपणाला कंटाळून हिंगोलीत शेतकर्‍याची आत्महत्या  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । हिंगोली

तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील एका ३२ वर्षीय शेतकर्‍याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी आत्महत्या केली. याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील शेतकरी जयाजी व्यंकोजी मंदाडे यांच्याकडे शेती असून सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला तसेच शेतातमध्ये असलेल्या बोअरवेलचे पाणी आटल्याने पेरणी करता आली नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँक आखाडा बाळापुर यांच्याकडुन ९९ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते, ते कसे फेडावे या विवंचनेत असताना जयाजी मंदाडे या शेतकर्‍याने शेता जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

खरीप व रब्बी पीकांचा हंगाम गेल्याने आता बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन शेतकरी जयाजी मंदाडे यांचे प्रेत ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृत जयाजी मंदाडे यांचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी आखाडा बाळापुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.