जामखेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, जामखेड

तालुक्यातील फाळकेवाडी (शिऊर) येथील शेतकरी नितीन उत्तम उतेकर (35) या तरुण शेतकऱ्याने खासगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उतेकर यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ व दोन मुले असा परिवार आहे.

नितीन उतेकर यांनी गेल्या वर्षी स्वतःचा टॅक्ट्रर नंदुरबार येथे ऊसतोडणीसाठी लावला होता. त्यासाठी खासगी सावकाराकडून दीड लाख रुपये कर्जाने पैसे घेऊन काही कामगारांना उचल दिली होती. परंतु ते कामगार कामावर न येताच गायब झाले. त्यामुळे ते ऊसतोडणीसाठी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे व्याजाचे पैसे वाढत गेले. याच मानसिक दबावाखाली होते. वडिलांच्या नावावर असणारी काही जमीन खासगी सावकाराकडे गुंतवली होती, अशी चर्चा नातेवाईकांमधे आहे.

गेल्या वर्षभरापासून तो व्याजाच्या पैशामुळे मानसिक तणावाखाली होता. मंगळवारी 12 मार्च रोजी सकाळी घराजवळील चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोतम उतेकर यांचा हा पुतण्या होता. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास आठ आत्महत्या झाल्या आहेत.