
सामना प्रतिनिधी, चारठाणा
चारठाणा येथून जवळच असलेल्या सेलू तालुक्यातील पीसी सांवगी येथील शेतकऱ्याने आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतातील विहिरीच्या मोटर गार्डला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेलू तालुक्यातील सांवगी येथील सुदाम किशनराव ताठे (45) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी सततची नापीकी व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील 2 वर्षांपासून त्यांना खरीप व रब्बी पिकाची उत्पन्न झाले नव्हते. शिवाय बँकेचे 4 लाख रुपयांचे कर्जही डोक्यावर असल्यामुळे ते नेहमी चिंताग्रस्त असायचे. याच विवंचनेत त्यांनी आज सकाळी विहिरीतील मोटर ठेवणीच्या गार्डरला दोरी बांधून गळफास घेतला.
याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बि.आर. गिते, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम ईगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सेलू येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह ताठे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुल, पत्नी असा परिवार आहे.



























































