
सामना प्रतिनिधी, शिरुर अनंतपाळ
येथील शेतकरी वैजीनाथ गोविंद तांबोळकर (वय 55) या शेतकऱ्याने ऊसात फवारण्यासाठी आणलेले तणनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वैजीनाथ तांबोळकर यांना कोरडवाहू हंगामी बागायत जमीन आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीपासून दुष्काळी परिस्थितीत ते जीवन जगत होते.
त्यांना दोन मुली व एक मुलगा असून एका मुलीचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. तर एक मुलगी इंजिनअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकण्यासाठी पुणे येथे आहे. वैजीनाथ तांबोळकर यांनी भारतीय स्टेट बँक येरोळ या शाखेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. सोसायटीचेही कर्ज होते. शेतकरी कर्जमाफीमध्ये त्यांनी अर्ज भरून दिला, परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव माफीच्या यादीत आले नसल्याने ते अस्वस्थ होते. 10 ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी ऊसातील तणनाशक औषध फवारण्यासाठी आणलेले औषध प्राशन केले. परंतु औषधाची दुर्गंधी आल्याने ही बाब मुलांच्या लक्षात आली. त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने लातूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वैजीनाथ तांबोळकर या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .































































