पाणी आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा विहिरीत बुडून मृत्यू 

39
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । बीड

बैल पोळ्याच्या सणानिमित्त विहिरीवरील देवतांची पुजा करण्यासाठी पाणी आणण्यासाठी उतरत असताना पाय घसरून विहिरीत बुडून डोक्याला गंभीर मार लागल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तालुक्यातील जाधववाडी येथे रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार उशिराने लक्षात आला. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   बेलु जानू जाधव (५०, रा.जाधववाडी ता.बीड) असे मृतत शेतकर्‍याचे नाव आहे. रविवारी बैल पोळ्याच्या सणादिवशी बेलु जाधव हे  त्याच्या विहिरीवरील काठावर असलेल्या देवाला नारळ फोडण्यासाठी गेले होते. यावेळी पुजेसाठी पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरत असताना अचानक काठावरून पाय घसरल्याने जाधव हे विहिरीत कोसळले. यावेळी डोक्याला गंभीर मार लागल्याने ते विहिरीतच बेशुद्ध पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान बराच वेळ झाल्यानंतरही जाधव घराकडे न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली तेव्हा विहिरीच्या काठावर नारळ दिसून आला. तर पाण्याचा तांबा विहिरीत तरंगतांना आढळून आला. दरम्यान जाधव हे विहिरीत कोसळले असावेत असा संशय आल्याने गळ लावून त्यांचा शोध घेण्यात आला. परंतू ते सापडले नाहीत. अखेर सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. ग्रामीण ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल येळे व राजाभाऊ गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या