
हरयाणामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शेतकर्यांनी मोर्चा काढून आंदोलन केले आहे. हरयाणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटले असून त्यांनी रास्ता रोको केला आहे. कुरुक्षेत्रच्या पिपली भागात या आंदोलनाचा मोठा जोर असून या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने तीन अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. पूर्वी एखाद्या व्यापार्याला फक्त बाजारातून माल विकत घेण्याची परवानगी होती आता नव्या अध्यादेशानुसार व्यापारी बाहेरून शेतमाल विकत घेऊ शकतात. तसेच धान्य, डाळी, खाद्य तेल, कांदा, बटाटा यांना गरजेच्या वस्तूच्या यादीत काढून टाकण्यत आले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. तसेच सरकार कंत्राटी शेतीला चालना देण्याच्या प्रयत्नात आहे. शेतकर्यांनी या अध्यादेशाला कडाडून विरोध केला आहे.
आमदार बलराज कुंडू यांनी शेतकर्यांसोबत आंदोलन केले तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सिरसा भागात पोलिसांनी नाकाबंदी करून आडत आणि मजुरांना रोखले आहे. सिरसातील आडतांना आणि मजुरांना पिपली येथील रॅलीत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले आहे. हरयाणा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आडतांना अटक केली आहे.






















































