दमदार पावसामुळे लावणीच्या कामांना वेग; बळीराजा सुखावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालूक्यात सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. समाधानकारक पावसामुळे लावणीची कामे वेळेत उरकणार असल्याने सुरवातीला चिंतेत असलेला बळीराजा आता सुखावला आहे.

कोकणातील मुख्य पीक भातशेती आहे. पाऊस वेळेत आणि तोही समाधानकारक झाला तरच शेतकऱ्याला या पिकातून थोडेफार उत्पन्न मिळते. पण जर पाऊस वेळेत पडला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. इतकच नव्हे तर वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते. पावसाच्या लहरीपणामुळेच कोकणातील शेतकरी पेरणी , लावणी , कापणी , झोडणी ही सारी शेतीची कामे वेळेत उरकण्याच्या प्रयत्नात असतात. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस आधिक लांबल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली होती. दूबार पेरणीची भिती शेतकऱ्याला झोपू देत नव्हती. वेळेत पाऊस सूरू झाला नाही तर शेतीची कामे कशी उरकायची या काळजीने शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले होते. मात्र, वरूणाराजाने कृपा केली आणी लांबलेला पाऊस कोसळू लागला. पाऊस पुन्हा कधी गायब होईल याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ लावणीच्या कामाला सुरवात केली. सद्यस्थितीत खेड तालुक्यात लावणीच्या कामाने वेग घेतला असून शेतात ढवळ्या पवळ्याच्या साथीने शेतकरी लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत.