तारीख पे तारीख! टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये मोदी सरकारचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी घेऊन गेल्या 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताना काही शेतकऱयांचा मृत्यू झाला. शेतकऱयांच्या संयमाचा बांध फुटू लागला असून ‘काळे कृषी कायदे कधी रद्द होणार’ असा सवाल केंद्र सरकारला करीत एका शेतकऱयाने टिकरी बॉर्डरवर गळफास घेत आत्महत्या केली.

टिकरी बॉर्डरवर रविवारी एक शेतकऱयाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटही सापडली. कर्मवीर सिंह (52) असे या आत्महत्या करणाऱया शेतकऱयाचे नाव असून तो सिंहवाला गावातील रहिवासी आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने ‘भारतीय किसान युनियन झिंदाबाद! हे मोदी सरकार केवळ तारखांवर तारखा देत आहे. हे काळे कायदे कधी रद्द होणार याचा काहीच अंदाज येत नाही पण जोवर काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. सकाळी गळफास घेतलेल्या या शेतकऱयाबाबतची माहिती आंदोलकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी शेतकऱयाच्या उपस्थितीत मृतदेहाला फांदीवरून काढले.

40 लाख ट्रक्टर्सची रॅली काढणार

दरम्यान, राकेश टिकैत यांनी चक्काजाम आंदोलनांनतर ‘किसान क्रांती 2021’ची घोषणा केली आहे. टिकैत यांनी 26 जानेवारी रोजी 20 हजार ट्रक्टरची रॅली दिल्लीत काढली होती. आता 40 लाख ट्रक्टर घेऊन रॅली काढली जाईल. या ट्रक्टरवर किसान क्रांती 2021 लिहिले जाईल असे सांगितले.