सकाळी तिसरीच्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता वाचली, त्याच रात्री वडिलांचीच चिता पेटली!

825

पाथर्डी जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर करत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कविता सदर केली. मात्र, त्याच रात्री या मुलाच्या वडिलांनीच विषप्राशन करत आत्महत्या केली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे घडला. या घटनेने भाराजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी मातृभाषा दिनानिमित्त भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली कविता सादर केली. भारजवाडी येथील हनुमान वस्तीवर असलेल्या तिसरीतील विद्यार्थी प्रशांत बटुळे याने शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून एक कविता रचून सादर केली.

शेतात कष्ठ करूनही तुझ्या डोक्याला ताप,
अरे बळीराजा नको करू आत्महत्या,
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती,पिक उगवणी करून मिळतात पैसे,
शेती करुनही तुझ्या हाताला फोड,
अरे बळीराजा नको करू आत्महत्या

अशी काळजाला भिडणारी कविता त्याने सादर केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी त्याने शेतकऱ्यांना साद घातली. या कवितेसाठी त्याचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक झाले. मात्र, नियतीने त्याच्यासमोर वेगळेच संकट निर्माण केले होते. ही कविता सादर करून तो घरी आला आणि त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. मल्हारी बटुळे शेतकरी होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे ते निराश झाले होते. नातेवाईकांनी त्यांना नगर येथे उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कविता करून शेतकऱ्यांना साद घालणाऱ्या प्रशांतला धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या