कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात 35 शेतकऱ्यांची 80 लाखांची फसवणूक

1845
file photo

सांगली, साताऱ्यापाठोपाठ नाशिक जिह्यातही कमी गुंतवणुकीत कडकनाथ कोंबडय़ांचे पालन करून जादा कमाईचे आमीष दाखवत महारयत ऍग्रो इंडिया कंपनीने 35 शेतकऱ्यांची 80 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंपनीच्या चार व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, फसवणुकीचा आकडा काही कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.

नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील शेतकरी शिवदास भिकाजी साळुंखे यांनी 25 मार्च 2019 रोजी कडकनाथ कोंबडी पालनाची माहिती मिळाल्यानंतर महारयत कंपनीच्या नाशिक शाखेशी संपर्क साधला. कॅनडा कॉर्नर येथील विराज टॉवरमध्ये कंपनीच्या कार्यालयात करार करून कर्मचाऱयांकडे त्यांनी 3 लाख 70 हजार रुपये दिले, त्याबदल्यात त्यांना कडकनाथ कोंबडीची एक दिवसांची एक हजार पिल्ले देण्यात आली. तीन महिने त्यांच्या खाद्य व लसीकरणासाठी साळुंखे यांनी 13 लाख 90 हजार रुपयांचा खर्च केला. सुदृढ कोंबड्य़ांसाठी ठरलेल्या किंमतीपेक्षा शंभर ते दोनशे रुपये जास्त नफा देण्याचे आमीष दाखविण्यात आले होते. तीन महिन्यांनंतर साळुंखे यांनी कंपनीकडे कोंबडय़ा दिल्या. मात्र, आजपर्यंत त्यांना कोणताही नफा आणि गुंतवलेली रक्कम मिळालेली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. त्यावरून सांगली जिह्यातील इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो इंडिया कंपनीच्या सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे आणि संदीप सुभाष मोहिते या व्यवस्थापकांविरुद्ध 13 लाख 90 हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीचा आकडा वाढणार

जिह्यातील नाशिक, सिन्नर, निफाड येथील 35 शेतकऱयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेल्या आहेत. या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा कोटय़वधींच्या घरात पोहचणार आहे. संबंधित शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या