
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱया शेतकऱ्यांना दररोज वाहतूककोंडीचा त्रास होत असतानाच, आता नेहमी भाजी उतरवून घेण्याच्या रस्त्यावरच गाळे काढण्याचा घाट बाजार समितीकडून घालण्यात आल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. यावरून भाजीपाला असोसिएशनने समितीच्या पदाधिकऱयांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण उलट शेतकऱयांचा उतरवून घेतलेला भाजीपाला चक्क रस्त्यावर बॅरिकेड्स लावून बंदिस्त करण्याचा तुघलकी प्रकार घडला. तब्बल चार दिवस हा नाशवंत भाजीपाला मुसळधार पावसातही तसाच पडून राहिल्याने तो कुजून दलाल व्यापाऱयांचे लाखोंचे नुकसान झाले. अखेर हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता ओळखून शनिवारी रातोरात हे बॅरिकेड्स काढण्यात आले असले, तरी समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकऱयांच्या हितासाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री व आमदार विनय कोरे आणि सतेज पाटील यांची सत्ता असलेल्या या बाजार समितीत कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधा देण्याचे नाव काढले जात नाही. मनमानी पद्धतीने कुठेही गाळे काढून विक्रीची परंपरा मात्र आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गेली 20 ते 25 वर्षे बांधून तयार असलेल्या 25 हून अधिक गाळ्यांची वापराविना दुर्दशा झाली असताना, दुसरीकडे रस्त्याकडेला बेकायदेशीर गाळे काढून त्याची भाडेतत्त्वावर विक्री करून त्याला कायदेशीर करण्याचे काम बिनदिक्कत सुरूच आहे. असाच आणखी एक प्रकार आता चव्हाटय़ावर आल्याने वाद निर्माण झाला आहे. पेठ वडगाव बाजार समितीत स्थानिक नसल्याचे कारण देत, कोल्हापूरच्या व्यापाऱयाला गाळा देण्यात आला नाही. पण पेठ वडगावच्या एका व्यापारासाठी कोल्हापूरच्या मार्केट यार्डात गाळा देण्यासाठी समितीची यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.
अनेक रस्त्यांवर मनमानी पद्धतीने गाळ्यांची रांग काढून बाजार समिती आता थांबेल असे वाटत असतानाच, वर्षानुवर्षे शेतकरी भाजीपाला उतरवत असलेल्या रस्त्यावरच आणखी गाळे काढण्याचा घाट घातल्याचे समोर येत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱयांना अगोदरच वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना, आता वाटेतच गाळे काढून वाहतुकीच्या होणाऱया प्रचंड कोंडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे शेतकऱयांनी भाजीपाला उतरविलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून भाजीपाला असोसिएशनचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे तब्बल चार दिवस टोमॅटो, दोडका, रताळी, काकडी, ढब्बू मिरची हा भाजीपाला भरपावसात भिजत तसाच पडून राहिल्याने तो कुजून गेला. त्यामुळे लाखांचे नुकसान झाले. भाजीपाला विक्रेत्या दलालांना याचा फटका बसला, तर शेतकऱयांना कमी भाव मिळाला. शेतकऱयांना दलाल विक्रेत्यांनी आर्थिक मदत केली.पण या नुकसानीची कसलीच जबाबदारी समितीच्या एकाही पदाधिकारी आणि संचालकांनी घेतली नसल्याचे येथील दलाल व्यापाऱयांकडून सांगण्यात आले.
समितीच्या कारभाराची भलतीच चर्चा
n शहरातील भाजीपाला मार्केट 1988च्या सुमारास मार्केटयार्डात स्थलांतरित झाले. एकूण 78 गाळे; पण चोहोबाजूंनी बेकायदेशीर गाळ्यांमुळे 150च्यावर ही संख्या गेली आहे. शेजारीच आणखी 25 गाळे तयार आहेत. त्याचे भाडे घेतले जाते; पण सुविधा नसल्याने ते कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहेत. अस्वच्छतेमुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे. याबाबत सत्ताधारी नेते व समितीचे संचालक मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आजही कायम आहे. त्या उलट बाजार समितीतून महिन्याला मिळणारे पाकीट, नातेवाईकांच्या नावाने टेंडर काढून अव्वाच्या सव्वा दराने होणारी लूट याचीच चर्चा सातत्याने होताना दिसून येत आहे. यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने, समितीच्या कारभारावरून भलत्याच चर्चेला उधाण येत आहे.
‘त्या’ व्यापाऱयाचे कोणाशी हितसंबंध?
n बाजार समितीच्या निरीक्षक कार्यालयात संबंधित पेठवडगावच्या व्यापाऱयाला गाळा देण्यात आला असून, फक्त भाजीच्या लिलावासाठी त्या व्यापाऱयाला मुख्य रस्त्याकडेला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मालाला चांगला भाव मिळणार असून, बाजार समितीलाही फायदा होणार असल्याचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, अन्य गाळे वापराविना पडून असताना तिथे व्यवस्था न करता, याच मार्गावर त्याला तूर्त सौद्याला परवानगी देण्यामागे काय गौडबंगाल आहे? कोणाशी आर्थिक लागेबांधे जोडले आहेत, याच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे.
























































