
‘अभ्यास करतो, समिती नेमतो, हे काहीच सांगू नका. आम्हाला पुन्हा उभे राहता येईल अशी नीट मदत देणार असाल तेच सांगा, नाही तर तुम्हाला रामराम’, अशा शब्दात संकटग्रस्त शेतकऱयांनी पालकमंत्री दादा भुसे यांना खडसावले. रविवारच्या अवकाळी पावसाने शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे हे सोमवारी निफाड तालुक्यात गेले होते. कसबे सुकेणे येथे त्यांनी काही ठराविक शेतात पाहणी केली. त्यावेळी शासनाकडून मिळणाऱया तुटपुंज्या मदतीवरून शेतकरी संतप्त झाले. भरत राजाराम मोगल या शेतकऱयाने पालकमंत्र्यांना चांगलेच खडसावले. ‘याच्या त्याच्यावर ढकलूच नका. आमच्यावरील संकटाचे निवारण करा. अभ्यास करतो, समिती नेमतो, हे काहीच सांगू नका. देणार असाल, तर आम्हाला पुन्हा उभं राहता येईल अशी मदत द्या. डायरेक्ट सांगा, नाही तर राम राम. आम्ही आता पार वैतागलोय. पुन्हा उभं राहता येईल अशी मदत द्या, नाहीतर काहीच नको. दोन-पाच हजारात नुकसानीचा खड्डा भरून निघणार नाही, ज्याचा निघणार असेल त्याला देवून टाका. आम्हाला तुटपुंजी मदत नको’, असे सूनावले.
स्वयंपाक सुद्धा केला नाही
‘भरपूर नुकसान झाले आहे. रडून रडून डोळे कोरडे झाले. दिवाळी दुःखात, कोरडी गेली. टोमॅटो मातीमोल भावात पन्नास रुपये पॅरेटने विकावे लागले. कांद्याला दहा रुपये सुद्धा मिळाले नाही. सोनंनाणं मोडलं, गळ्यात घालायला सुद्धा नाही. आता सांगा कसं काय करायचं? कालपासून दुःखाचा डोंगर कोसळलाय, स्वयंपाक सुद्धा केला नाही’, असे एका शेतकरी महिलेने सांगितले.
..तरच आमच्याकडे या!
‘पालकमंत्री रस्त्यावरून पाहणी करून गेले, ते शेतकऱयाच्या वावरात सुद्धा घुसले नाही. कांदा रोपं, ऊस, टोमॅटो, सर्वच पिकांचे नुकसान झाले. नेते मंडळी फक्त बांधावर उभे राहिले, शेतात घुसा, चिखलाने पाय भरवा, आमची परिस्थिती काय होते ते बघा’, असा संताप मंदाकिनी भंडारे या कसबे सुकेणे येथील महिलेने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. रस्त्यावर उभं राहून काहीच होवू शकत नाही. तुम्ही आम्हाला काही देणार नाहीच, पण आमच्यापर्यंत आले नाही की बोलले सुद्धा नाहीत. दहा-दहा लाखांचा खर्च आणि मदत काही हजारांची. पूर्ण भरपाई होईल अशीच मदत द्या, नाही तर तुम्ही आमच्याकडे आले नाही तरी चालेल, असेही या महिलेने सरकारला सूनावले.
पोरांची फी कशी देणार
‘उरलीसुरली द्राक्षे ही सडायला सुरुवात झाली. आमची पोरं क्लासला जाताना रोज पैसे मागतात. द्राक्ष विक्री झाली की, फी देतो, असे आम्ही त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना सांगतो. संपूर्ण उद्ध्वस्त झाले, आता फी देणार कशी?’, असा टाहो कसबे सुकेणे येथील एका शेतकरी महिलेने पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर पह्डला.



























































