
गतवर्षी सोयाबीनच्या दरात झालेली समाधानकारक वाढ, खरिपात बियाण्यांसह होणारी मागणी यामुळे जिह्यातील शेतकऱयांचा उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. जिह्यात आतापर्यंत 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
सातारा जिह्यात सोयाबीनची खरीप हंगामात मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी 65 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, सुमारे 75 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. मागील खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱयांना प्रोत्साहित केले होते. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत सोयाबीनची कमी-अधिक स्वरूपात पेरणी झाली आहे.
गतवर्षी सोयाबीनचे दर दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. सध्याही दर सहा ते साडेसहा हजार रुपये क्विंटल मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर दरात वाढ होईल, या आशेवर सोयाबीन लागवड करण्याकडे कल वाढला आहे. अनेक शेतकऱयांकडून सोयाबीनची नगदी पिकाप्रमाणे काळजी घेतली जात आहे. ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे.
आले, ऊस या नगदी पिकांतही आंतरपीक म्हणून सोयाबीनची टोकणी केली जात आहे. काही शेतकऱयांनी वर्षात तीन वेळा सोयाबीनचे प्रयोग केले आहेत. जिह्यात उन्हाळी हंगामात 1340 हेक्टरवर लागवड झाली. यामध्ये सर्वाधिक सातारा, कोरेगाव, कराड, खटाव, वाई तालुक्यांत सोयाबीनची लागवड झाली आहे.






























































