चिखलणी यंत्राच्या साहाय्याने शेती करणे झाले सोपे, महिलेने दाखवले नांगरणीचे प्रात्यक्षिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले महत्त्व पटवून देऊ लागल्या आहेत. पारंपरिक शेतीकामातही महिला बैलांचं जोखड हातात धरून पुरुषांच्या बरोबरीने करतात, मात्र सध्या शेतीतसुद्धा अनेक नाविन्यपूर्ण तांत्रिक, आधुनिक बदल होत आहेत. बैलांच्या जोखडाऐवजी शेतीकामासाठी ‘पॉवर टिलर’चा वापर करणे अगदी सोपे झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे गावातील दीपाली बोले या महिलेने नुकतेच या आधुनिक मशीनच्या साहाय्याने शेतीकामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या दिपाली बोले यांनी यावेळी सांगितले की, पुरुषवर्ग नोकरी धंद्यानिमित्त शहराकडे असल्याने शेती करणार कोण म्हणून गावात अनेक ठिकाणी शेती ओस पडलेली दिसत आहे, मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास खूप कमी खर्चात शेती करता येते. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याचा इतर महिलांनी फायदा व्हावा, आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करता यावी याकरिता हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही दरवर्षी सुमारे चार-पाच खंडी भातपीक घेतो. त्यासाठी आम्हाला दोन बैल जोतांसाठी चार बैल पोसावे लागत होते. यांचा वार्षिक खर्च काढल्यास शेती परवडणे शक्यच नव्हते, म्हणून आम्ही यावर्षी सात अश्वशक्तिचे चिखलणी यंत्र (पॉवर टिलर) खरेदी केले. ते यंत्र महिलांनाही सहज चालवता येते. हे यंत्र मी स्वतः चालवलं आहे. चालवण्यास खूप साधं आणि सोपं आहे. बैलजोडी खर्चाच्या अवघ्या दहा टक्के एवढ्या कमी खर्चात यंत्राने शेती करता येते. आम्ही बैल जोडी काढून आता शेतीसाठी शेणखताची गरज भागवण्यासाठी स्थानिक हवामान मानवणाऱ्या दोन जर्सी गाई घेणार आहोत. त्यामुळे घरी दूधही उपलब्ध होईल. शेणखताचा विषय संपुष्टात येईल. आता महागाईच्या काळात हे व्यापारी तत्त्व अवलंबूनच शेती करावी लागणार आहे. तरच आपली शेतीतून निश्चित उन्नती होईल, असा ठाम विश्वास दिपालीताई यांनी बोलताना व्यक्त केला.