
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेत वास्तव्य करता यावे यासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ फार्मिंगटॉन’ या बोगस विद्यापीठात हिंदुस्थानच्या 129 आणि एका विदेशी विद्यार्थ्याने नोंदणी केली. आपण हा एक गुन्हा केला आहे, याची माहिती या सर्व विद्यार्थ्यांना होती असा दावा अमेरिकेच्या होमलॅड सिक्युरिटीने केला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना होमलॅड सिक्युरिटीच्या पोलिसांनी गेल्याच आठवडय़ात अटक केली. फार्मिंगटॉन विद्यापीठात शिकवण्यासाठी प्राध्यापक नाहीत की वर्गही नाही. या विद्यापीठाची ऑनलाइन शिक्षणाचीही सेवा नव्हती, हे सर्व माहीत असतानाही या सर्व विद्यार्थ्यांनी अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी हा गुन्हा केला आहे, असे होमलॅड सिक्युरिटीने म्हटले आहे.
129 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना अटक केल्याबद्दल हिंदुस्थान सरकारने अमेरिकेकडे चिंता व्यक्त केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील हिंदुस्थानी दूतावासाशी संपर्क करण्यास परवानगी द्या, अशी विनंती केंद्र सरकारने अमेरिकेस केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींकडे परराष्ट्र मंत्रालयाचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ फार्मिंगटॉन हे बोगस विद्यापीठ चालविणाऱया आठजणांना यापूर्वी अटक केलेली आहे. हे आठ जण हिंदुस्थानी नागरिक किंवा हिंदुस्थानी अमेरिकन नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेतून पळ काढला
युनिव्हर्सिटी ऑफ फार्मिंगटॉन या बोगस विद्यापीठात नोंदणी करणाऱया 600 विद्यार्थ्यांना वर्क परमिट मिळाले आहे. यामधील बहुसंख्य जण हे हिंदुस्थानी आहेत. मात्र अटकेचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी अमेरिकेतून पळ काढला आहे.






























































