
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला बुधवारी नमाज अदा करण्यासाठी मशीदीत गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांच्या दिशेने बूटही भिरकावण्यात आले. अब्दुल्ला यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा दिल्याचा निषेध करण्यासाठी जमावाने त्यांना लक्ष्य केले. वाढता विरोध पाहता अब्दुल्ला यांनी तिथून काढता पाय घेतला. काही माथेफिरू लोकांना वाटते अशा गोष्टी केल्याने फारुख अब्दुल्ला घाबरेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. भारत माता की जय बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही असे ते म्हणाले. या घटनेने मी मुळीच घाबरलेलो नाही. अशा लोकांमुळे मला काहीही फरक पडत नाही. हिंदुस्थान विकास करत आहे आणि कश्मीरलाही विकासाचा मार्ग निवडायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. माझ्याविरोधात निदर्शने करण्यासाठी जमावाने दुसरी वेळ निवडायाला हवी होती. नमाजाच्यावेळी अशा गोष्टी करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
Mein darne wala nahi hun. Agar yeh samajhte hai ki ise azadi aayegi toh mein inko kehna chahta hun ki pehle begaari,beemari aur bhookmari se azadi pao: Farooq Abdullah on protests against him during Eid prayers for raising’Bharat Mata ki Jai’ slogans during Vajpayee’s prayer meet pic.twitter.com/F0dCBoDJ80
— ANI (@ANI) August 22, 2018
ईद उल अजहानिमित्त हजरतबल मशीदीत फारुख यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. नमाज सुरु होण्यापुर्वी जमावाने अचानक अब्दुल्ला यांच्याविरोधात नारेबाजी सुरू केली. त्यानंतर काहीजण अब्दुल्ला यांच्याजवळ गेले आणि त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यादिशेने बूटही भिरकावण्यात आले. अब्दुल्ला यांच्याविरोधात जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शांततापूर्ण चर्चा करण्याची वेळ आली आहे. द्वेष सोडून दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा देश सर्वधर्मियांचा असून येथील प्रत्येक नागरिकाचा हा देश आहे. अशा घटनांना मी घाबरत नाही. त्यांच्या अशा वागण्याने स्वातंत्र्य मिळणार नाही. तुम्हाला कोणापासून स्वातंत्र्य हवे आहे. बेकारी, रोगराई आणि भूकबळी यापासून स्वातंत्र्य मिळवण्याची खरी गरज आहे, असे ते म्हणाले.
भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत अब्दुल्ला यांनी उपस्थित लोकांना भारत माता की जय आणि जय हिंद असे नारे देण्यास सांगितले होते. उपस्थितांना त्यांनी जोरदार आवाजात त्यांनी हिंदुस्थानचा जयघोष करण्यास सांगितले. तसेच भाषण संपवतानाही त्यांनी तीन वेळा जय हिंद म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे फुटीरतावाद्यांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांच्याविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.

























































