
एक तरुण फॅशन डिझायनर प्रियकरासोबत बेपत्ता झाल्याने एका अभिनेत्रीने पोस्ट लिहून नेटकऱ्यांना विनंती केली आहे. त्यामुळे नेटकरीही चक्रावले असून या फॅशन डिझायनरचा आणि अभिनेत्रीचा नेमका काय संबंध आहे, असा प्रश्नही त्यांना पडला आहे.
अहमदाबाद इथल्या वस्त्रापूरमध्ये राहणारी 23 वर्षांची वृष्टी जशुभाई नावाची फॅशन डिझायनर तरुणी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे तिचा प्रियकर शिवम पटेल हाही तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. वृष्टीचे कुटुंबीय परदेशात राहतात आणि ती इथे एकटीच राहते. वृष्टी बेपत्ता झाल्यापासून तिला शोधण्यासाठी तिचे आईवडील शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी तिला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दोघांचेही शेवटचे लोकेशन मेहसाणा दाखवण्यात येत आहे. पण त्यानंतर त्या दोघांचे मोबाईल बंद आहेत.
अभिनेत्री सोहा अली खान हिने वृष्टी हिला शोधण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं आहे. ही मुलगी अहमदाबाद इथे राहत असून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. हिचा शोध लागल्यास त्वरित पुढील क्रमांकावर कळवा असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोहाचं हे कृत्य खरोखर प्रशंसनीय आहे. पण, वृष्टी आणि सोहाचा नेमका संबंध काय, या प्रश्नामुळे नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत.



























































