फास्टॅग नसेल तर आजपासून द्यावा लागणार दुप्पट टोल

714
fastag-toll-plaza

गुलाबी थंडीची चाहूल लागलीय… नववर्षाच्या स्वागतासाठी जेमतेम दोन आठवडे शिल्लक राहिलेत. अनेकांनी आतापासूनच नववर्षाची पार्टी कुठे करायची याचे प्लॅनिंग सुरू केले असेल. मित्रपरिवारासोबत लॉँग ड्राइव्हची मजा घेत गोवा किंवा आणखी कुठेतरी पोहोचायचे आणि धम्मालमस्ती करायची असा फक्कड बेतही आखला असेल. पण त्याआधी जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही गाडीला फास्टॅग लावून घेतला नसेल तर रविवारपासून दुप्पट टोल भरावा लागणार आहे. इतकेच नाही तर फास्टॅग नसलेल्या गाडय़ांसाठी वेगळ्या रांगेत थांबावे लागेल.

लांबच लांब रांगांमुळे तुमचा बराच वेळ खर्ची घालवावा लागेल. याआधी फास्टॅग लावण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर होती. त्यानंतर त्यासाठीची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. ही मुदत उद्या रविवारी संपत आहे.

फास्टॅग हे टोल भरण्यासाठीचे प्रीपेड रिचार्जेबल टॅग आहे. गाडीवर फास्टॅग लावल्यानंतर टोलनाक्यावरून जाताना या फास्टॅगच्या माध्यमातून आपोआप टोल कापला जाईल. त्यामुळे टोलनाक्यावर गाडी थांबवण्याची गरज नाही. या यंत्रणेमुळे लांब रांगेमध्ये उभे राहण्याची गरज राहणार नाही. विंडस्क्रीनवर चिकटवलेल्या या फास्टॅगशी लिंक्ड असलेल्या बँक अकाऊंट किंवा प्रीपेड वॉलेटमधून टोल कापण्यात येईल. हा फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करील. फास्टॅगमध्ये एक्स्पायरी डेट नसते. जोपर्यंत तो खराब होत नाही किंवा वाचता येण्याजोगा असतो तोपर्यंत तो कार्यरत राहतो.

10 किलोमीटरच्या आत राहणाऱयांना सवलत
टोल नाक्यापासून 10 किलोमीटरपर्यंत राहणाऱयांना टोलमध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित बँकेत किंवा जवळच्या पीओएस लोकेशनवर तुमचा सध्या राहत असलेला पत्ता पुराव्यादाखल जमा करावा लागेल. पत्त्याची पडताळणी झाल्यानंतर फास्टॅगमध्ये सवलत देण्यात येईल.

कुठे मिळेल फास्टॅग
राज्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये फास्टॅग मिळू शकेल. ऑनलाइनद्वारेही तो खरेदी करता येईल. ‘माय फास्टॅग ऍप’च्या माध्यमातून याबाबतची सर्व माहिती मिळू शकेल. या ऍपच्या माध्यमातून फास्टॅग ऑनलाइन रिचार्जही करता येतो.
– एनएचआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग संस्थेच्या 1033 या टोल फ्री क्रमांकावर फास्टॅगबद्दलची माहिती मिळू शकेल.
– या क्रमांकावर फास्टॅगशी संबंधित तक्रारी देता येईल.
– 8 ते 14 नोव्हेंबरदम्यान या क्रमांकावर 5653 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 5301 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
– देशभरात तब्बल 28,376 केंद्रांवर फास्टॅगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– 23 बँका या सुविधेशी जोडण्यात आल्या आहेत.
– एका वाहनावर एकच फास्टॅग लावता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या