संसारात अडचण ठरणाऱ्या चिमुरड्याचा निर्घृन खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । पारनेर

सावत्र मुलाची नव्या संसारात अडचण नको म्हणून पाच वर्षीय चिमुरड्याचा बापानेच गळा आवळून खून केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना तालुक्यातील खडकवाडी येथे घडली. अर्णव हरिष उर्फ जावेद सत्तार सुरत्ने हा 10 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद हरिष उर्फ जावेद सुरत्ने याने दिल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी अर्णवचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हरिष सुरत्नेच्या निर्दयीपणाचा पर्दाफाश झाला व आरोपी हरिष यास पोलिसांनी अटक केली.

तालुक्यातील खडकवाडी येथील सचिन सोनबा ढोकळे यांच्या कुक्कुटपालन केंद्रावर हरिष सुरत्ने रा. सायखेड ता. संग्रामपुर, जि. बुलढाना हा गेल्या दिड महिन्यापासून त्याची पत्नी कांचन, मुलगा अर्णव व मुलगी गुंजन हे कामगार म्हणून वास्तव्यास होते. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेदोन वाजता हरिष सुरत्ने याने सचिन ढोकळे यांना फोन करून 12 पासून अर्णव बेपत्ता झाल्याचे कळविले. सचिन ढोकळे यांनी कुक्कुटपालन केंद्राकडे धाव घेत गावातील नागरीकांच्या मदतीने परिसरात अर्णवचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता सचिन ढोकळे व इतर लोक परिसरात अर्णवचा शोध घेत असताना कुक्कुटपालन केंद्रापासून 100 ते 125 फुट अंतरावर असलेल्या मांडओहळ धरणाच्या कालव्याच्या पाईपाच्या तोंडात लहान मुलाचे पाय दिसून आले. ढोकळे व इतरांनी खात्री केली असता तो अर्णव याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या गळ्याभोवती कशाने तरी आवळल्याचे व्रण दिसत होते. पोलीस तपासात या मुलाचा खून त्याच्या सावत्र बापानेच केल्याचे आढळून आले.