जन्मठेपेच्या कैद्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर केला कारागृहातच बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका विकृताने आपल्याच मुलीवर कारागृहातच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. गंभीर म्हणजे बलात्कार करून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राजस्थान येथील जोधपूरमधल्या खुल्या कारागृहात हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीचा पिता हा जन्मठेपेचा कैदी आहे. एका हत्येचा गुन्हा त्याच्यावर असल्याने त्याला अटक होऊन शिक्षा झाली होती. त्याला जोधपूर येथील खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

काही काळापूर्वी त्याची पत्नी आणि मुलगी त्याच्यासोबत राहायला आली होती. काही दिवसांनी त्याची बायको त्याला सोडून पुन्हा घरी जायला निघाली तेव्हा त्याने मुलीला त्याच्याचकडे ठेवून घेतलं.

बुधवारी पीडितेने आईला फोन करून तिच्यावर वडिलांनीच बलात्कार केल्याचं सांगितलं. ते ऐकून तिच्या आईने त्वरित पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी हालचाल करून कारागृह गाठलं. पण, मुलीने केलेल्या तक्रारीचा सुगावा लागल्याने आरोपी आधीच फरार झाला.

पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे खुल्या कारागृहाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.