बापाने पोटच्या गोळ्याला तृतीयपंथीयास विकले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

crime

लॉकडाऊनमुळे चांदी कारागिरीचे हातातील काम गेल्याने बेरोजगार झालेल्या व्यसनाधीन बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलालाच नोटरीद्वारे एका तृतीयपंथीयास दत्तक दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात या मुलाला पाच लाखाला विकण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांकडुन करण्यात येऊ लागल्याने, याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान, संबंधित मुलाला जिल्हा बाल संरक्षण कक्ष विभागाने ताब्यात घेऊन, बालकल्याण संकुलात रवानगी केली आहे.तर अद्यापही याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षकडुन मिळालेल्या माहितीनुसार शहरात गंगावेश परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह एका भाड्याने घेतलेला हा तरुण चांदी कारागीर आहे. लाॅकडाऊनमुळे मे महिन्यात नोकरी गेल्याने, आजारी पत्नी व मुलांचे पोषण करणे शक्य नसल्याने त्याने मोठ्या दहा वर्षाच्या मुलास आपल्या जवळ ठेवून पत्नीला लहान मुलासह माजगांव, ता. पन्हाळा येथील माहेरी पाठवून दिले. दोन महिने झाले तरी या मुलासोबत बोलणे करुन देण्यास टाळाटाळ होत असल्याने, आज्जीने येऊन चौकशी केली असता,मुलाला सांभाळायला दिल्याचे सांगुन टाळाटाळ केली जात होती.

अखेर एका तृतीयपंथीयाला दत्तक दिल्याचे समोर आल्यानंतर आज्जीने त्या तृतीयपंथीयाची भेट घेतली असता त्याने पाच लाख रुपये दिले असुन ते दिल्यानंतरच मुलाला परत देऊ असे सांगितले. त्यामुळे आज्जीसह नातेवाईकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन संस्थेकडे यासंदर्भात शुक्रवारी तक्रार केली. यानंतर काल शनिवारी पोलिसांच्या मदतीने तृतीयपंथींयाकडुन त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याला बाल कल्याण संकुलात दाखल करण्यात आले.

गंभीर प्रकरणाची पोलिसांत नोंद नाही?
दरम्यान एकीकडे त्या बापाने नोटरीद्वारे मुलाला पाच लाखांत दत्तक दिल्याची माहिती मिळत होती.तर दुसरीकडे संबंधित तृतीयपंथीया ने धार्मिक विधीसह त्या मुलाचे कागदोपत्री नाव लावण्यासाठी खर्च केलेले पाच लाख रुपये दिल्यानंतरच मुलगा घेऊन जा असे सांगितल्याची ही माहिती मिळत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.बेकायदेशीर दत्तक प्रकरणाच्या नावाखाली मुलाची विक्री? त्यात धार्मिक विधी मुळे त्या मुलावर शारिरीक परिणाम काय झालं असावा अशी शंकाही निर्माण झाली असताना, याप्रकरणी अजुनही पोलिसांत तक्रार दाखल झाली नसल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

बेकायदेशीर दत्तक प्रकरण
दरम्यान यासंदर्भात जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी सागर दाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावृत्ताला दुजोरा दिला. तसेच संबंधित तृतीयपंथींला नोटरीद्वारे हा मुलगा दत्तक दिला असला तरी ते बेकायदेशीर असल्याने याप्रकरणीही दत्तक देणारा आणि घेणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या