पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून मुलीवर केले वार, माथेफिरू बाप फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोपं सटकलेल्या पतीने आपल्या पोटच्या मुलीवर चाकूने वार केल्याची संतापजनक घटना चेंबूर येथे घडली. हे कृत्य केल्यानंतर माथेफिरू बाप पसार झाला असून टिळक नगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पी. एल. लोखंडे मार्गावरील सिद्धार्थ नगरात राहणारा कमलेश सोळंकी (34) असे आरोपीचे नाव आहे. कमलेश त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. त्यातूनच तो मुलीचादेखील राग करायचा. दरम्यान, तू पत्नीसोबत मुलुंडला राहायला का जातेस, अशी विचारणा करत कमलेशने आपल्या राहत्या घरी 12 वर्षांच्या मुलीच्या छाती आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर घाबरलेल्या कमलेशने तेथून पळ काढला. तर नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने मुलीला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कमलेशविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.