
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून अनेक गंभीर घटना घडत आहेत. त्यात पैशांच्या वादातून 62 वर्षीय बापानेच मुलावर ऑसिड फेकल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरातील वसंतनगरात नुकतीच घडली आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱया घटनेने खळबळ उडाली आहे. ऑसिड हल्ल्यात तरुणाच्या चेहऱयाला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषार शाम कदम (30) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी श्याम यशवंत कदम (62) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कदम कुटुंबीय कोथरूडमधील केळेवाडी परिसरात राहतात. 14 मे रोजी तुषारचे वडील श्यामने त्याच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र तुषारने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून श्यामने स्वच्छतागृहात वापरासाठी असलेल्या ऑसिडची बाटलीच मुलगा तुषारच्या अंगावर फेकली.



























































