
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिवाळीच्या तोंडावर भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, मिठाई, फरसाण व अन्य खाद्यपदार्थ शहरात आणून ते नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न भामटय़ांकडून केला जातो. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कंबर कसली असून गेल्या दोन दिवसांत शहरामध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी धडक कारवाया केल्या. काही दुकानांवर छापे मारून तेथे असलेला लाखो रुपयांचा भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, मिठाई, फरसाण व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.
सणासुदीला नागरिकांकडून मिठाई, फरसाण, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांना होणारी मागणी लक्षात घेऊन त्याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न भेसळखोरांकडून केला जातो. भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेत एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचाऱयांनी भेसळखोरांविरोधात कंबर कसली आहे. सर्वत्र करडी नजर ठेवली असून खबऱयांना कामाला लावले आहे. चार दिवसांपूर्वी एफडीएच्या पथकांनी धारावी, पुर्ला, बंदर रोड तसेच बोरीवली येथील वेगवेगळय़ा दुकानांवर छापे मारले. त्यावेळी त्या दुकानांमधून तीन लाखांचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. त्यात स्पेशल बर्फी, मावा, खाद्यतेल, फरसाण, शेव आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. एकूण 12 खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित दुकानमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
भेसळीबाबत 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्प साधून माहिती द्यावी.
परवानाधारक व नोंदणीधारक दुकानदारांकडूनच खरेदी करावी.
दिवाळीच्या तोंडावर भेसळखोरांचे पेव फुटणार आहे. नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात खाद्यपदार्थांची मागणी होते. त्यामुळे भेसळखोर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून ते नागरिकांच्या माथी मारतात. त्यांना रोखण्यासाठी एफडीए सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत; पण नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. हलक्या दर्जाचे, कमी किमतीचे खाद्यपदार्थ घेण्याचे टाळावे, तसेच शक्यतो नामांकित दुकानातून खरेदी करावे व अधिकृत बिल घ्यावे. आम्ही आहोतच, पण नागरिकांनीदेखील मदतीचा हात दिल्यास भेसळखोरांचे मनसुबे उधळून लावू.
– शैलेश आढाव, सहआयुक्त (एफडीए)


























































