अभिप्राय – सकारात्मकतेकडे नेणारा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अस्मिता येंडे

काव्य, नाटक, ललित लेखन इत्यादी विविध साहित्य प्रकारात मुशाफिरी करणाऱ्या लेखिका प्रा. विजया पंडितराव यांनी एक संवेदनशील, पण तितकाच प्रेरित करणारा विषय कादंबरीच्या स्वरूपात वाचकांपुढे मांडला आहे. मानवी जीवन म्हणजे ऊन- सावलीचा खेळ असतो. कधी काय घडेल, काहीच सांगता येत नाही, कशाची शाश्वती नाही. आपण ठरवतो एक आणि घडतं भलतंच, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. या अनिश्चिततेसोबत कसे जगावे, आलेल्या प्रसंगाना कशा प्रकारे तोंड द्यावे, याची नवी दृष्टी देणारी ही ‘अनपेक्ष’ कादंबरी. कादंबरीचे शीर्षकच बरेच काही व्यक्त करते. कथानकाची मांडणी उत्तम पद्धतीने लेखिकेने केली आहे. त्यामुळे कादंबरी वाचताना वाचक त्यात हमखास गुंततो. पुढे काय घडेल, याची उत्कंठा सतत निर्माण होत राहते.

रेणू आणि जयदीप ही कादंबरीची मुख्य पात्रे असून त्यांच्याभोवती कथानक फिरत राहते. तसेच रेणू-जयची मुले, आई, काका, डॉक्टर तसेच जयचे मित्र अशी पात्रे कादंबरीत भेटतात. आपल्या नवीन घराची सुंदर स्वप्नं सजवत असताना अचानकपणे रेणू – जयच्या आयुष्यात भयंकर वादळ निर्माण होतं. सगळं कसं सुरळीत सुरू असताना अचानक आलेल्या संकटाला नायक-नायिका कसे सामोरे जातात, याचे चित्रण करणारी ही संवेदनशील कादंबरी.

रेणू ही कुटुंबवत्सल, प्रेमळ, हळवी आणि जबाबदारीचं भान असणारी विवाहित स्त्र्ााr तसेच कर्तव्यप्रिय प्राध्यापिका.जयदीप हा एकदम धीट, धैर्यवान, जगण्याची उत्कट इच्छा असणारा, जिद्दी, प्रबळ मनोधैर्य असणारा, पण नास्तिक. अशी ही दोन वेगवेगळ्या मनोवृत्तीची पात्रे. ब्रेन टय़ुमर या आजाराशी झुंजणारा जयदीप, त्याला रेणूने दिलेली साथ, मनात आलेले नैराश्य, हतबलता, कुटुंबाची होणारी ओढाताण, परिचितांनी दिलेला मानसिक आधार यामुळे सर्वांची पणाला लागलेली सहनशीलता मनाला विषण्ण करते. एवढय़ा गंभीर आजाराकडे जयदीपची पाहण्याची दृष्टी इतकी वेगळी कशी? हा विचार मनात निर्माण होतो. आपल्या जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सकारात्मक मनोवृत्तीने जयदीप कॅन्सरला कसा पराजित करतो, याची प्रेरक कहाणी लेखिकेने अगदी ओघवत्या शैलीत आणि संयतपणे लिहिली आहे. जयदीप हे पात्र जगण्याची ऊर्मी निर्माण करणारं आहे. उत्तम कथानक, उत्कृष्ट पात्रर्निर्मिते, संवादशैली, प्रवाही लेखनामुळे कादंबरीच्या कथानकाला गती प्राप्त झाली आहे.

‘आताचं मिळालेलं आयुष्य म्हणजे एक्सटेंशन आहे’, ‘लाइफ इज अ बबल ऑफ वॉटर ’ ही दोन वाक्ये पुनः पुन्हा अधोरेखित केलेली आढळून येतात. ही वाक्ये जगण्याची एक नवी संकल्पना मांडतात. जयदीपचा मृत्यूकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टिकोन, गोठलेल्या संवेदना याला कारणीभूत असलेल्या घटनेचे वास्तव चित्रण हृदयद्रावक आहे.

जीवन जगताना प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने जगायला हवा. येणाऱया संकटांना धीराने तोंड द्यायला हवे. अचानक येणारे ऊन-सावली झेलत आयुष्य जगायचं असतं. अडचणी येणार, त्यावर मात करत पुढे जात राहणं हेच आयुष्य आहे, हा सकारात्मक संदेश देणारी ही ‘अनपेक्ष’ कादंबरी आहे. आयुष्यातील ही अनिश्चितता जगण्याचे खरे मर्म आहे. चिंतनशील, गंभीर विषय संवेदनशीलतेने, हळुवारपणे मांडून, मानवी मनाच्या अवस्था विशद करून मनोबल वाढवणारी, जगण्याचा नवा

मंत्र देणारी ही कादंबरी प्रेरणादायी आहे.
अनपेक्ष : कादंबरी
लेखिका : प्रा. विजया पंडितराव
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठे: 104, मूल्य : रुपये 200/-